ब्लड बॅंकांचे पुणेकरांना आवाहन
पुणे – करोनाची भीती न बाळगता रक्तदानासाठी पुढे या, असे आवाहन बहुतांश रक्तपेढ्यांनी केले आहे. चुकीच्या माहितीमुळे रक्तदाते रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत, त्यामुळे या रक्तपेढ्यांना हे आवाहन करावे लागले आहे.
दरवर्षी मार्च महिन्यात परीक्षा, सुटी आणि उष्ण हवामान या तीन गोष्टींमुळे मुळात रक्त संकलनाचे रक्तपेढ्यांपुढे मोठे आव्हान असते, त्यातून आता करोनाच्या भीतीची अधिकच भर पडली आहे. त्यामुळे दुहेरी आव्हान उभे राहिले असून, रक्तपेढ्यांना याचा सामना करणे क्रमप्राप्त झाले आहे. यासाठी जनकल्याण रक्तपेढीने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रक्तसंकलन अभियान सुरू केले आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे काही ठिकाणी रक्तदान शिबिरे स्थगित किंवा रद्द केली आहे. मात्र, त्यामुळे रक्तसंकलनावर परिणाम होत आहे. करोनावरील उपचारांवर रक्ताची गरज नसते परंतु अन्य आजार, शस्त्रक्रिया याला रक्ताची नितांत गरज असते.
मनसे कार्यालयात संपर्क साधा
ज्या रुग्णाला रक्ताची गरज आहे अशा रुग्णांच्या नतेवाईकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नारायण पेठ येथील शहर कार्यालयात दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत संपर्क साधावा असे मनसे तर्फे कळवण्यात आले आहे. हव्या असलेल्या रक्ताच्या गटाची माहिती आणि हॉस्पिटलची माहिती उपलब्ध करून दिल्यास मनसे रक्तदाता हा संबधित हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा रक्तपेढीत जाऊन रक्त देईल. याशिवाय शहरातील हॉस्पिटल व्यवस्थापनालाही महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून सूचित करणारी पत्रे देण्यात येतील.
उन्हाळ्यात रक्ताचा तुडवडा भासतो, परंतु अशा संकटामुळे जर हे संकलन अधिकच कमी झाले तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. वास्तविक रक्तदान करताना आणि रुग्णाला रक्त देत असताना अशा दोन्ही वेळी “करोना’ विषाणूच्या संसर्गाची अजिबात भीती नाही, हे आधी लक्षात घेणे आवश्यक आहे. रक्तदान करताना आणि ते रुग्णाला देताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
– डॉ. अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण रक्तपेढी