-डॉ. मेघश्री दळवी
करोनाशी लढताना पहिला मुद्दा असतो तो संसर्ग टाळण्याचा. हा विषाणू वेगवेगळ्या पृष्ठभागावर काही काळ राहतो आणि तिथून तो दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित होतो. या प्रकारे संसर्ग वाढण्याचा धोका या महामारीच्या सुरुवातीलाच लक्षात आला होता. त्यामुळे सतत निर्जंतुकीकरण करणे हा त्यावरचा उत्तम उपाय असतो. व्यक्तिगत पातळीवर आपण हात स्वच्छ करत राहतो आणि सोबत सार्वजनिक जागी निरनिराळ्या पृष्ठभागाशी संपर्क टाळतो. स्पर्श झालाच तर लगेच सॅनिटायझरने हात निर्जंतुक करून घेतो. मात्र हॉस्पिटल, ऑफिस किंवा जिथे माणसांची सतत ये-जा असते तिथे इतर उपायांचा विचार करावा लागतो.
अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर यासाठी फायदेशीर आहे. या किरणांमधले “सी’ गटातले उच्च फ्रिक्वेन्सीचे किरण जीवाणू-विषाणूंचा संपूर्ण नाश करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतात. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट-सी वापरून निर्जंतुकीकरण करणे हा मार्ग करोनाच्या लढ्यात महत्त्वाचा आहे. त्यात फक्त एक मोठी अडचण आहे की हे किरण माणसासाठी घातक असतात. त्यामुळे तिथे रोबोट्स हा पर्याय योग्य ठरतो.
काही मोठ्या हॉस्पिटल्समध्ये यासाठी रोबोट्सचा वापर सुरू झाला होता. करोनाचा प्रसार वाढायला लागला, तसा हा उपाय इतरांनीही करणं जरुरी झालं. सर्व प्रकारचे पृष्ठभाग अत्यंत वेगाने आणि नियमितपणे निर्जंतुक करून घ्यायचे असतील तर रोबोट्सना खरोखरीच पर्याय नाही. आता काही ऑफिसेसमध्ये या उपायाची चाचणी सुरू आहे. लिफ्ट किंवा स्वच्छतागृहं थोडा काळ बंद ठेवून अशा प्रकारे पूर्ण निर्जंतुक करून घेणं सोयीचं पडतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील निर्धास्तपणे वावरणं शक्य होतं.
पृष्ठभागासोबत हवेतूनही करोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो असं संशोधकांच्या एका मोठ्या गटाने आता सुचवलं आहे. माणसं बंदिस्त जागेत जास्त काळ इतर व्यक्तींच्या सहवासात घालवत असतील, तर संसर्गाचा धोका अधिक असतो, असेही एका पाहणीतून दिसून आलं आहे. त्यामुळे केवळ पृष्ठभागावर न थांबता संपूर्ण खोल्यांचं किंवा पॅसेजसारख्या जागांचं सतत निर्जंतुकीकरण करत राहणं आता गरजेचं होऊ लागेल. त्यासाठी ड्रोनरूपी रोबोट्स वापरू शकतो का, याची चाचणी आयर्लंडमधील शास्त्रज्ञांचा एक गट घेत आहे.
हा प्रयोग यशस्वी झाला तर रस्ते, बागा, मॉल्स, गृहसंकुले, बाजारपेठा या जलदपणे आणि सुरक्षितपणे निर्जंतुक करता येतील. अल्ट्राव्हायोलेट-ए गटातले कमी धोकादायक किरण वापरणे, गर्दीच्या वेळा टाळून किंवा रात्री निर्जंतुकीकरण करणे अशा पर्यायांसोबत ड्रोन रोबोट्सचा वापर हा दीर्घकालीन वापरासाठी कदाचित सर्वात प्रभावी उपाय ठरू शकेल.