नवी दिल्ली – दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यासाठी केंद्राने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 15 जानेवारी 2021 ही अंतिम तारीख दिली होती. मात्र, दरम्यानच्या काळात करोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यामुळे सरकारने ही मुदत 1 जून 2021 पर्यंत वाढविली आहे.
ज्वेलर्सचे काम सध्याच्या परिस्थितीत वेळेअगोदर पूर्ण करता येणे शक्य नाही. त्यामुळे ज्वेलर्सनी मुदतवाढ मागितली होती. या मागणीचा विचार करून सरकारने ही मुदत वाढविली असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. आता नव्या वेळापत्रकानुसार 1 जून 2019 पासून ज्वेलर्सना फक्त 14, 18, 22 कॅरेटचे सोन्याचे दागिने विकता येतील.
हॉलमार्किंग लोकप्रिय व्हावे यासाठी एप्रिल 2000 पासून प्रयत्न करण्यात येत असून सध्या देशभरातील 40 टक्के दागिने हॉलमार्किंगचे असतात. आतापर्यंत 28 हजार 849 ज्वेलर्सनी यासाठी नोंदणी केली आहे. दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना संरक्षण मिळावे यासाठी या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. भारत हा दागिने वापरात जगातील सर्वांत मोठा देश आहे.