प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 – आकर्षक फुलांच्या सजावटीचे रथ….डीजेचा दणदणाट… पारंपारिक ढोल-ताशांच्या वाद्यांचा खणखणाट….हिंदी-मराठी गाण्यांवर तरुणाईंचे थिकरणे व धांगडधिंगा…रात्री गणेश भक्तांची अलोट झालेली गर्दी….अशा उत्साही वातावरणात कुमठेकर रस्त्यावरील एकूण 48 गणेश मंडळानी गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष करत गणरायाला निरोप दिला. या मार्गावर सुमारे 21 तास मिरवणूक चालली होती. दोन वर्षांपूर्वी या मार्गावरुन 46 मिरवणूका निघालयाच्या. यंदा त्यात दोन मंडळाची वाढ झाली होती. या मार्गावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली. ज्ञानप्रबोधिनी प्रशाला गणेशोत्सव मंडळापासून मिरवणूक सुरू झाली.
या मंडळाने ढोल-ताशांच्या पथकासह अतिशिय शिस्तबद्ध मिरवणूक काढली. त्यानंतर तुळशीबागेतील मयुरेश मित्र मंडळाचे 12.30 वा. आगमन झाले. या मंडळाच्या मिरवणुकीत नूमविचे ढोल पथक सहभागी झाले होते. फुलांनी सजावट केलेल्या रथाद्वारे मिरवणूक काढण्यात आली. यानंतर थेट सायंकाळी 6 वाजता सदाशिव पेठेतील अनंत मित्र मंडळाने समाज प्रबोधनपर जिंवत देखावा सादर केला.
तुळशीबागेतील श्री गजानन मित्र मंडळाने जगन्नाथपुरीचा रथाद्वारे मिरवणूक काढली. शिवनेरी या वाद्य पथकाने खणखणाट केला.
आळंदीतील वारकरी टाळ-मृदुंगासह सहभागी झाले होते. रविवार पेठेतील श्री सुंदर गणपती तरुण मंडळ ट्रस्टने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा इको फ्रेंडली देखावा सादर करत ज्ञान प्रबोधिनी व तालचक्र या दोन वाद्या पथकाच्या ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत लक्ष वेधले. खालकर चौक मित्र मंडळाने आकर्षक देखावा सादर करुन ओम व शौर्य या वाद्य पथकाच्या सहाय्याने मिरवणूकीत सहभाग घेतला.
सदाशिव पेठेतील विश्रामबाग मित्र मंडळाने फटाक्यांची आतिशबाजी केली. डीजेवर लावलेल्या गाण्यांवर तरुणाई भान हरपून नाचली. यावेळी भाविकांनी गर्दी केली होती. यात एक तरुणी जखमी झाली. गोखलेनगरचा राजा अचानक मित्र मंडळ, बालरत्न तरुण मंडळ यांनी डीजेद्वारे मिरवणूक काढली. खैरेवाडीतील वीर चाफेकर तरुण मित्र मंडळाने अश्वरथाचा देखावा सादर करत डीजेवर गाणी लावली होती. जनवाडीतील पाचपांडव मित्र मंडळाने तुळजाभवानी मातेचा रथ असलेला देखावा सादर करत डीजेचा आवाज खणखणवला. गोखलेनगर येथील शिवप्रताप मित्र मंडळाने रात्री 12.30 वाजता मार्गावर आले होते. रात्री 1.15 वाजता अखिल सेनापती बापट रोड सार्वजनिक गणेशात्सव मंडळ मिरवणूक मार्गावर आले होते.
वेळेची मर्यादा धुडकावून डीजे सुरुच
रात्री 12 वा.नंतर डीजेला बंदी होती. मात्र हे नियम धुडकावून काही मंडळानी रात्री 12.30 वाजेपर्यंत डीजे सुरुच ठेवले होते. काही मंडळे दीड-दोन एका जागेवरुन हललेच नाहीत. यामुळे दोन मंडळातील अंतरही खूप वाढले होते. शुक्रवारी रात्री 1.15 वाजेपर्यंत केवळ 13 गणेश मंडळे कुमठेकर मार्गावर होते. त्यानंतर 2.30 पर्यंत 26 मंडळे मार्गस्थ झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत मंडळाना मार्गस्थ होण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर शनिवारी सकाळी 6 वा. पुन्हा डीजेला सुरुवात झाली आणि 10 वाजेपर्यंत मिरवणुका सुरुच होत्या.