संदीप राक्षे
सातारा -शहराच्या नागरिकांना घरपट्टी ऑनलाइन पद्धतीने सहज जमा करता यावी, याकरिता ऑनलाइन कर संकलन प्रणाली सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया इंटिग्रेटेड वेब बेस पोर्टल प्रकल्पांतर्गत राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पायलट प्रोजेक्टसाठी सातारा नगरपालिकेची निवड झाली आहे.
नगरपरिषद संचालनालयाचे उपायुक्त राजेश कानडे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील 15 नगरपालिकांची या पायलट प्रोजेक्टसाठी निवड झाली
असून त्यामध्ये सातारा नगरपालिकेचा समावेश आहे इंटिग्रेटेड वेब बेस पोर्टल तयार करण्यात येऊन त्यामध्ये ट्रेनिंग ऑफ यू एल बी स्टाफ म्हणजेच नोडल अधिकारी नेमून त्याच्या अंतर्गत नगरपालिका कामकाजाची पूर्ण जाण असणारे प्रशिक्षित कर्मचारी या पोर्टलसाठी स्वतंत्रपणे काम करणार आहेत. याबाबतचा प्रशिक्षण कार्यक्रमसुद्धा पार पडला असून सातारकरांची ऑनलाइन संकलन प्रणाली येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. शहराची हद्दवाढ झाल्यामुळे शहराच्या मिळकतींची संख्या 40 हजारांवर गेली आहे. त्यामुळे कर संकलन प्रणालीला ऑनलाइन पद्धतीने कसे सुनियोजित करता येईल,
हे काम या पोर्टलद्वारे केले जाणार आहे. कारण नागरी सुविधा केंद्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर रांगा लावून घरपट्टी भरण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असल्याने मोबाइल अथवा इंटरनेटच्या माध्यमातून ती सहज कशी करता येईल, या दृष्टीने सातारा पालिकेच्या संशोधन विभागाचे अभियंता काम करत आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी “प्रभात’ला दिली.
सुविधा लवकरच ः अभिजित बापट
या पोर्टलच्या माध्यमातून एक विशिष्ट क्यूआर कोडसुद्धा विकसित केला जाणार आहे. त्यामुळे सातारकरांना कुठूनही ऑनलाइन घरपट्टी तसेच इतर काही शुल्क सहजपणे भरता येणे शक्य होणार आहे. या ऑनलाइन प्रणालीचे समन्वय, समायोजन, व्यवस्थापन याचे प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या रंगीत तालमी सध्या सुरू आहेत. या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास सातारकर कोठूनही ऑनलाइन पद्धतीने घरपट्टी भरू शकणार आहेत. लवकरच हा इंटिग्रेटेड प्रकल्प सुरू होऊन त्याची सुविधा सातारकरांना उपलब्ध होईल, असा ठाम विश्वास मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी व्यक्त केला.