दोन वर्षे आधीपासून भाजपाकडून पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न
पाटील, कुल, पडळकर आदींची फौज मैदानात
केडगाव – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाने शरद पवार यांच्या बारामतीवर चाल करून पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नुकतेच नूतन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा करून गड भेदण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे; परंतु मागील अनेकवेळा आक्रमण करून देखील बारामतीचा गड अभेद्य ठेवण्यात पवार कुटुंबाला यश आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपाने दोन वर्षे अगोदरच सुरू केली असल्याने बारामतीचा गड भेदण्याची भाजपाची रणनीती यशस्वी होणार का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना पाठिंबा देऊन 2014 मध्ये तर 2019 मध्ये दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या रूपाने स्वतंत्र उमेदवार उभा करून भाजपाने बारामती जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता; परंतु बारामती लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची लोकप्रियता आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा तळागाळात असणारा संपर्क अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील विकासकामांच्या जोरावर दोनवेळा भाजपला यश आले नाही म्हणून की काय येत्या 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने दोन वर्षे अगोदरच सुरू केली आहे. कुठल्याही परस्थितित बारामतीचे मैदान मारायचेच अशी अटकळ बांधली आहे, त्यासाठी आतापासूनच प्रदेशाअध्यक्ष बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे, त्याचाच फायदा 2014मध्ये राष्ट्रीय समाजाचे नेते महादेव जानकर यांना झाला होता हे गणित डोळ्यासमोर ठेऊन कर्जत-जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार आणि धनगर चेहरा असणाऱ्या माजीमंत्री राम शिंदे यांना बारामती मतदारसंघाचे सर्व नियोजन देण्यात आले आहे, त्यांच्या मदतीला इंदापूर तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील, दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, आमदार गोपीचंद पडळकर या मंडळींची फौज तयार केली आहे. शिवाय भाजपाच्या केंद्रातील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा आगामी काळात आयोजित करून बारामतीतील राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा चंग बांधला जात आहे.
पवारांचा “त्यात’ हातखंडा
अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची ताकत शरद पवार यांच्याकडे असल्याने बारामतीत बदल घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न यशस्वी होणार की पवार याही वेळी त्यांना धोबीपछाड करणार हे आगामी काळात दिसून येणार आहे.
पवारांच्या मौनामुळे भाजपाच्या गोटात चिंता
माध्यमांच्या प्रतिनिधींनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडण्याचा प्रयत्न केला असता बारामतीत अजित पवारांचे काम बोलते अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र आजपावेतो कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार यांच्याविषयी अनेक वादग्रस्त वक्तव्य करूनदेखील शरद पवार यांनी आपले मौन सोडले नाही. शरद पवार हे राजकारणातील चाणक्य समजले जातात, त्यांच्या मौन राहण्यामुळे भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पवार यांचे मौन म्हणजे भाजपाची मोठी डोकेदुखी बनली आहे.