सातारा – येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे शुक्रवारी रात्री एका सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाच्या चारचाकी गाडीने युवकाला धडक दिली. त्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्या मेंदूला, बरकड्यांना जोराचा मार लागला आहे. संबंधित चालकाने अपघात होताच गाडी लॉक करुन पळ काढला. लक्ष्मणकुमार सिंह (वय १९, सध्या रा. पालवी चौक, गोडोली, सातारा) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे टाटा कंपनीच्या कारची (एमएच ५० एल ७४४९) लक्ष्मणकुमार सिंह याला शुक्रवारी रात्री जोराची धडक बसली. ही धडक झाल्यानंतर अज्ञात कारचालकाने गाडी लॉक करुन तेथून पळ काढला. या कारमध्ये पोलिसांची टोपी असल्याने कोणत्या तरी पोलिसाची गाडी असावी, असा लोकांचा समज झाला. त्यानंतर तेथे एकच गर्दी झाली.
काही लोकांनी जखमी लक्ष्मण कुमारला उपचारासाठी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याच्या मेंदूला, बरकड्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरु केला असता ही कार प्रशांत निकम या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.