पिंपरी – तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला केंद्राकडून लवकरच मंजुरी मिळणार आहे. याबाबत स्वतः केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत माहिती दिली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. अशीच परिस्थिती देहूरोड सेंट्रल चौक ते चांदणी चौक दरम्यान देखील असते. या मार्गांवरील कोंडी कमी करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याची माहिती खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन महत्वाच्या रस्त्यांबाबत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून देहूरोड सेंट्रल चौक-किवळे-वाकड-चांदणी चौक मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ला जोडणाऱ्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे.
मात्र अद्याप या मार्गांचे काम सुरु झालेले नाही. यामुळे तळेगाव, चाकण, शिक्रापूर, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी येथे जाणारी अवजड वाहने, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ कडे (मुंबई-बेंगलोर महामार्ग) जाणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडतात. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या दोन्ही मार्गावरील कामाला मंजुरी कधी मिळेल आणि काम कधीपर्यंत सुरु होईल, असे बारणे यांनी आपल्या प्रश्नात म्हटले.
या वेळी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दरम्यान उड्डाणपुल बांधला जाणार आहे. त्याचे डिझाईन बनवण्यात आले असून त्याचा डीपीआर देखील तयार झाला आहे. तो डीपीआर दिल्ली येथे मंजुरीसाठी आला आहे. त्याला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे.