शिवथर – विकास कामांबरोबर जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.त्याचबरोबर मतदारसंघातील गावात वाडी-वस्तीवर विकासाचे गंगा पोहोचवत आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने गावच विकास करणे माझी जबाबदारी असून विकास कामामुळे गावे प्रगती पथावर पोहचणार आहेत. त्यादृष्टीने पुढील वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन आ. महेश शिंदे यांनी केले.
म्हसवे (ता. सातारा) येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण, अंगणवाडी इमारत व मंदिर सुशोभीकरण अशा विविध कामांना पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
संदीप शिंदे म्हणाले, आ. महेश शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते खुले केले. यामुळे शेतकऱ्याला दळणवळण करण्यासाठी मार्ग मोकळा झाला. शेतीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता देण्यासाठी ते कटीबध्द आहेत. तसेच त्यांच्या माध्यमातून सोई-सुविधा मिळत आहेत. संपूर्ण मतदारसंघात सगळीकडे विकासकामे पूर्णत्वास गेली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. आ. महेश शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य मानसिंग शिंगटे, भाजपा तालुकाध्यक्ष निलेश नलावडे, इंद्रजित नलवडे, सरपंच मनीषा दीक्षित, उपसरपंच रमेश शेलार, ग्रामपंचायत सदस्य सचिन शेलार, चव्हाण विलास, शेलार शंकरराव शेलार, सतीश शेलार, सारंगनाथ शेलार, ग्रामसेवक गावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.