लोणी काळभोर – बायफचे कम्पाऊंड तोडून चार एकराच्या चार्यावर ट्रॅक्टरने नांगर फिरविल्याची घटना घडली. उरुळी कांचन (ता. हवेली) जवळील टिळेकरवाडीमध्ये घडली. याप्रकरणी मयुरेश मुकुंद कुलकर्णी (वय 40, रा. ऊरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार अर्जुन गोपीचंद कादबाने (रा. सहजपूर, ता. दौड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरेश कुलकर्णी हे बाएफ संस्था (भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठाण) ऊरुळी कांचन येथे सन 2009 पासून नोकरीस असून राज्य प्रशासकिय अधिकारी आहे.
व्यवस्थापक संदीप घोरपडे हे सोमवारी सकाळी तेथे गेले असता त्यांना कम्पाउंंड तुटलेले आढळले. तसेच चार एकराच्या चार्यावर ट्रॅक्टरने नांगर फिरविल्याचे दिसून आले. घोरपडे यांनी तात्काळ ही माहिती बाएफचे राज्य प्रशासकीय अधिकारी मयुरेश कुलकर्णी यांना दिली.
याबाबत चौकशी केली असता हा प्रकार अर्जुन कादबाने याने केला असल्याचे समोर आले. त्यानंतर कुलकर्णी यांनी अर्जुन कादबाने याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कादबाने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करत आहेत.
तारांचे कुंपण, संरक्षक भिंत तरीही
या संस्थेमध्ये कृत्रिम रेतन तयार करणे व संकरीत चारा संशोधन करण्याचे काम चालते. हा चारा व रेतन ’ना नफा, ना तोटा’ या तत्वावर संपूर्ण भारतभर गोरगरीब शेतकर्यांना पुरविले जाते. त्याकरीता संस्थेमध्ये सर्व जातीचे संकरीत वळु पाळले जातात. बायफ संस्थेचा संपूर्ण परिसर हा सुमारे 100 एकरचा असून, त्यापैकी बर्याच जागेमध्ये जनावरांकरीता चारा पिकवला जातो. उरुळी कांचन नजिकच्या चार एकर क्षेत्रात लसूण आरएल बहुवार्षिक 88 जातीचे पीक डिसेंबर 2022 मध्ये लागवड केले आहे. या क्षेत्राचे तीन बाजूने तारेचे कम्पाउंड व एका बाजूने भिंत आहे.