सातारा – येथील रविवार पेठेतील लोणार गल्लीतील व्यंकटेश अपार्टमेंटसमोर आठ सीटच्या सार्वजनिक शौचालयात रविवारी (दि. 24) रात्री महिलेचा पुतळा ठेवून भीती निर्माण करण्याचा खोडसाळपणा कोणी तरी केला. रात्री वीज नसताना, काही महिला शौचालयात गेल्या. त्या भीतीने किंचाळत बाहेर आल्या. हा प्रकार कोणी केला याची माहिती मिळू शकली नाही.
कोणी तरी विकृत व्यक्तीने शौचालयात महिलेचा पुतळा ठेवून, त्यावर साडी पांघरली होती. या परिसरातील वीजपुरवठा रात्री 9 नंतर अचानक खंडित झाल्याने अंधार होता. काही महिला गडबडीत शौचालयात गेल्यावर, तेथे हा पुतळा पाहून गर्भगळीत झाल्या. त्या ओरडत बाहेर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही तरुणांनी मोबाइलच्या टॉर्चच्या साह्याने शोध घेतला असता, शौचालयात ठेवलेला पुतळा दिसला. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.