पौड – मुळशी तालुक्यातील रिहे खोर्यातील मोरेवाडी पडाळ आणि खेंगरेवाडी येथे दहशत माजविण्यासाठी मंगेश नामदेव पालवे आणि त्याच्या काही साथीदारांनी कुर्हाड व कोयत्याने पाच ते सहा घरांची तोडफोड केली. यात तीन चारचाकी व दोन दुचाकी गाड्यांचेही नुकसान केलेले आहे.
शनिवारी (दि. 23) रात्री मोरेवाडी आणि पडाळ आणि खेंगरेवाडी येथे मंगेश पालवे व त्याच्या काही साथीदारांनी दारू पिऊन कुर्हाड आणि कोयत्याने दिसेल त्या घरांचे दरवाजे तोडले. तसेच घरात नुकतेच भरडून आणलेल्या तांदळाची पोतीही फोडली. घरात दिसेल त्या वस्तूची तोडफोड केली.
मंगेश पालवेवर पौड पोलीस स्टेशन येथे अनेक गुन्हे दाखल असून त्याच्या दहशतीपुढे ग्रामस्थ हतबल झालेले आहेत. रविवारी (दि. 24) पहाटे नागरिकांनी पौड पोलिस स्टेशन येथे येऊन पोलिसांना घटनेचे गांभीर्य सांगितले. पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत पोलीस परिसरात मंगेश पालवेचा शोध घेत होते. अखेर मंगेश पालवे आणि त्याचा साथीदार अथर्व मोरे यांना अटक करण्यात आली.
सर्व नागरिकांनी पौड पोलिस स्टेशनला येऊन पालवेंवर कडक कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. पालवे शाळेत जाणार्या मुलांनाही मारहाण करतो. तसेच गावात येणार्या फेरीवाल्यांनाही मारहाण करतो. त्याच्या दहशतीमुळे आम्ही गाव सोडून जाण्याच्या तयारीत आहोत. असे येथील नागरिकांनी सांगितले.
सहा तासांच्या प्रयत्नानंतर अटक
मंगेश पालवे याला अटक करण्यासाठी गेले असता आरोपीने पोलिसांच्या त्यांच्या अंगावर कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केला.पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, उपनिरीक्षक सुरेश गिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंभार, हवालदार एन. एम. रावते, सुधीर होळकर, दीपक पालके, पोलीस शिपाई समीर शेख, ए. एम. तळपे, एन. बी. गायकवाड, गौतम लोकरे यांच्या पथकाने सहा तासांच्या अथक प्रयत्नाने आरोपींना ताब्यात घेतले.
मंगेश पालवे हा सराईत गुन्हेगार असून. पालवेवर खुनाच्या गुन्हासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापूर्वी मोक्कातंर्गतही कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यातूनही तो सुटला. इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून जर कोणी मुळशी तालुक्यात अशा प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल
-मनोजकुमार यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पौड