सातारा – प्रतिकुल परिस्थितीशी सामना करत, आयुष्याचे ध्येय साध्य करणारे सिद्धार्थसारखे विद्यार्थी विद्यालयाचे भूषण आहेत. सद्य स्थितीत नैतिक मूल्यांची जपणूक करत, आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहणे, ही राष्ट्राची गरज ओळखून सिद्धार्थ नक्कीच प्रशासकीय सेवेत कार्यरत राहील, असा विश्वास प्रा. डॉ. सौ. मीरा दीक्षित यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विधी अधिकारी वर्ग-1, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र या पदी शाहूपुरी विद्यालयाचा माजी विद्यार्थी सिद्धार्थ राजेंद्र कांबळे याची निवड झाल्याबद्दल त्याच्या गौरव सोहळ्यात सौ. दीक्षित बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष भारत भोसले, पालक राजेंद्र कांबळे, सौ. रेखाताई कांबळे, प्रवीण दीक्षित, माजी विद्यार्थी सूरज कांबळे, मोहन जाधव, सुशील जाधव, गौरव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत भोसले म्हणाले, संस्थेचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी, ज्या विचारांची पेरणी केली, ते आता उगवायला लागले आहेत. त्याचा मनस्वी आनंद आहे. सिद्धार्थचे अभिनंदन करतानाच, त्याच्या या यशातून विद्यार्थ्यांनी बोध घेऊन मन, मनगट व मेंदू या आधारे आपले आयुष्य परिपूर्ण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
राजेंद्र कांबळे म्हणाले, सिद्धार्थसह माझ्या चार मुलांच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीत शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाचा मोठा सहभाग आहे. सिद्धार्थ, त्याची आई सौ. रेखाताई यांची जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत यामुळेच हे घडू शकले.
सत्काराला उत्तर देताना सिद्धार्थ कांबळे म्हणाले, माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे. या विद्यालयात व्यक्तिमत्व विकास शिबिरातील प्रबोधनामुळे, शिक्षकांनी मुलांना शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. याच संस्कारांच्या शिदोरीवर मी माझे आयुष्य सार्थकी लावेन. प्रवीण दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. मधुकर जाधव यांनी स्वागत केले. विद्यार्थिनी सई मोरेने आभार मानले. यावेळी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.