खंडाळा – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी नायगाव, ता. खंडाळा येथे स्मारकाला करण्यात आलेल्या दुग्धाभिषेकप्रकरणी नायगाव ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील बहुजन समाजबांधव आक्रमक झाले होते. या विषयी सकल बहुजन समाजातर्फे शुक्रवारी (दि. 5) निषेध सभा झाली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने पोलीस उपनिरीक्षक सतीश अंदेलवार व कर्मचारी उपस्थित होते.
या सभेत विविध मान्यवरांनी तीव्र भावना व्यक्त करत, दुग्धाभिषेक प्रकरणाचा निषेध केला. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. हा दुग्धाभिषेक कशा पद्धतीने केला गेला? त्यामागचा हेतू काय? तो कोणी करायला लावला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्या कार्यक्रमाचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे, त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन करण्यात आलेला प्रकार निंदनीय व माफी मागण्यायोग्य नाही. आम्हाला जातीय तेढ निर्माण करायचा नाही. मात्र, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये. त्या घटनेची यापुढे पुनरावृत्ती होऊ नये, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. याकरिता दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मान्यवरांनी केली.
सभा सुरू असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. ते म्हणाले, मानापमानाकडे लक्ष न देता आपले कार्य करत राहायचे, ही फुले दाम्पत्याची शिकवण आहे. दुग्धाभिषेकाचे घडलेले कृत्य पूर्ण चुकीचे होते. मात्र, त्यातील संबंधित पाचही जणांनी जाहीर माफीनामा दिला आहे. त्यामुळे हा विषय इथेच संपवावा. गावात विविध विकासकामे करायची आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करावे. यावर उपस्थितांनीही सकारात्मक प्रतिसाद देत, मंत्री भुजबळ आणि जमलेल्या फुलेप्रेमींचे आभार मानले.