लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ( लोणी काळभोर, ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतून बेपत्ता झालेली दोन लहान मुले पोलिसांच्या समयसुचकतेमुळे अवघ्या तासाभरात आईवडिलांच्या कुशीत विसावली. लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे परिसरात कौतुक केले जात आहे.
मुलीसा प्रकाश थापा (वय 4) व प्रतिक प्रकाश थापा (वय 3, रा. दोघेही, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) अशी मुलांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (दि 5) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. मुलांचे आई-वडील हे कदमवाकवस्ती परिसरातील संभाजीनगर परिसरात राहतात. एका गृहरचना संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्या प्रकाश हरी थापा या नेपाळी व्यक्तीची ही मुले आहेत.
शुक्रवारी दोन्ही मुलांना घरी ठेऊन दोघेही गॅस सिलिंडर आणण्यासाठी गेले होते. यावेळी राहत्या घरापासून खेळता-खेळता दोन्ही मुले वाट चुकली, एक-दोन नाही तर घरापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब, वाहनांच्या गर्दीतून वाट काढत लोणी काळभोर स्मशानभूमी परिसरात येऊन थांबली. येथे आनंद खाडे (रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) यांना दिसली. त्यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे व पोलीस हवालदार योगेश कुंभार यांना मुलांची माहिती दिली.
जोजारे यांनी मुलांना नाव विचारण्याचा प्रयत्न केला मात्र लहान असल्याने त्यांना स्वत:चे नाव सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांसमोर त्यांच्या आई-वडिलांना शोधण्याचे आव्हान होते. दरम्यान पोलीस हवालदार रामदास मेमाणे यांनी गावातील सर्व व्हॉटस अप ग्रुपमध्ये मुलांच्या फोटो सह माहिती शेअर केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली जोजारे व त्यांचे सहकारी शोध घेऊ लागले.
शोध घेत असताना संभाजीनगर येथील प्रकाश थापा यांची दोन्ही मुले बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खात्री करून दोन्ही मुले सुखरूप पालकांच्या स्वाधीन केली. सलग दुसर्यांदा अशी कामगिरी केल्याने लोणी काळभोर परिसरात पोलिसांचे कौतुक केले जात आहे.