पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विद्यार्थ्यांना आयुष्यात मोठे होण्यासाठी छोट्या गोष्टींना महत्त्व द्यावे. स्वप्न मोठे पाहा; पण ते पूर्ण करत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.
खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने खडकी, बोपोडी, दापोडी, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, येरवडा या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला भेट दिल्यानंतर गोयल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, डॉ. काशिनाथ देवधर, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, स्वामीराज भिसे, झांबरे, वाघ, लोणकर, प्रा. काकडे, हजारे, बरेलू , माकर व अन्य शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात एकूण २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चित्रकला, हॉकी, फुटबॉल, नेमबाजी, क्रिकेटसारखे खेळ, योगासने, रामायण कथा, भारतीय ज्ञानपरंपरा, रेडिओ, कुंडी भरण, सांस्कृतिक, तसेच जुन्या कागदांपासून हातमागाचा कागद तयार करणे, सोलर लॅम्प तयार करणे, विज्ञान मनोरंजनातून शिकवणे व मोबाईलपासून काही तास दूर ठेवणे असे विविध प्रकार शिकवले जात आहेत.
छोट्या गोष्टींमधून माणूस कसा मोठा होतो, याचे उदाहरण कृष्णकुमार गोयल यांनी दिले. याच शिक्षण संस्थेमध्ये लहानाचा मोठा झालो आणि आज कोहिनूर ग्रुपचा अध्यक्ष आहे. त्याचा प्रवासही त्यांनी सांगितला. माणसातील कोहिनूर होणे कसे गरजेचे असते, हे त्यांनी या वेळी स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.