रहिमतपूर येथील घटना
रहिमतपूर – हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे एसटी बस चालकाचा मृत्यू झाल्याची घटना रहिमतपूर येथे घडली. याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण ते वडूज या बसवर सुरेश यादवराव भोसले (वय 49, रा. कोनगाव, ता. कल्याण) चालक म्हणून काम करीत होते. वाहक रोहित शिवलिंग साखरे यांच्यासोबत ते काल शुकवारी कल्याण येथून एसटी बस घेऊन वडूज येथे आले होते.
आज ती बस वडूज येथून कल्याण येथे घेऊन जाण्यासाठी दुसऱ्या बसमधून वडूजला जात असताना रहिमतपूर येथील वडूज फाट्यावर सुरेश भोसले ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसले होते. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी बस चालकाने व वाहकाने बस रहिमतपूर येथे सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेली. तिथून त्यांना रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ईसीजी काढण्यासाठी पुन्हा सिटी हॉस्पिटलमध्ये पाठवले. परंतु, तेथील डॉक्टरांनी भोसले यांचा इसीजी तपासून ते हृदयविकाराने मृत झाल्याचे सांगितले. यावरून रोहित साखरे यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.