मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मयुरेश्वर मंदिरात राज्यभरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. वर्षाअखेरीचे अवघे काही तास शिल्लक असताना नव्या संकल्पाच्या निमित्ताने आज भावीकांची गर्दी होती.
पहाटे पाच ते रात्री चंद्रोदयाच्या वेळेपर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते. गुरव मंडळींची प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य दरवाजा मयुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना उघडण्यात आला. यानंतर सकाळी सात वाजता सालकरी विजय ढेरे यांची पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला.
दुपारी बारा वाजता श्रींची पूजा करून पुन्हा नैवद्य दाखविण्यात आला. या वर्षातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. राज्यभरातील भावीकांनी गर्दी केल्यामुळे मोरगावला यात्रेचे स्वरूप आले होते.
चंद्रोदयाच्या वेळेस आरती झाल्यानंतर श्रीस महानैवेद्य दाखवण्यात आला. सुपा पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.