साताऱ्यात कांदा सव्वाशेवर

सातारा – साताऱ्यात कांद्याचे दर सव्वाशे रुपये किलो आणि पालेभाज्यांही महागल्याने गृहिणींच्या रोजच्या स्वयंपाकाला महागाईची झणझणीत फोडणी मिळू लागली आहे. भाजीतला कांदा शंभरी पार गेल्याने बजेट कोलमडले असून डोळ्यातून पाणी येणेच बाकी आहे.

डाळीच्या दरांचा उच्चांक आणि हिवाळ्याच्या तोंडावर महागलेली अंडी, मांसाहार यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे गणित पुरते कोलमडले असून स्वयंपाकघराचे बजेट मांडताना गृहिणींची मोठी कसरत होत आहे. रोजच्या जेवणातील भाजीसाठीचा सरासरी खर्च 100 रुपयांवरून 200 रुपयांवर गेला असल्याने स्वयंपाकघराचे मासिक बजेट दुपटीवर गेले आहे.

त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये कडधान्याच्या उसळी, बटाट्याचा रस्सा अशा पदार्थावर भर दिला जात आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कोकण पुणे बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून साताऱ्यात होणारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

एकीकडे कांद्याचे दर सव्वाशे रुपये किलोवर पोहोचले असताना भाज्या आणि डाळीही महाग झाल्याने स्वयंपाकाचे काय, असा प्रश्‍न रोज सतावू लागल्याची प्रतिक्रिया गृहिणींमधून व्यक्त होत आहे. महागाईतून सावरण्यासाठी आता महिलांनी स्वयंपाकात नव-नव्या शक्कल लढविल्या आहेत. भाज्यांचे दर वाढल्यामुळे कडधान्यांचा जेवणामध्ये जास्त वापर करावा लागत आहे. याशिवाय, बटाटा भाजीचे वेगवेगळे प्रकार तयार करीत असून त्यामध्ये कांद्याचा कमी वापर होईल, याकडे त्या लक्ष देतात.

सातारा शहर व उपनगरातील हॉटेलमधून कांदा गायब झाला असून पर्याय म्हणून काकडी दिली जात आहे. पालेभाज्या घेणे परवडणारे नसले तरी, कमी प्रमाणात पालेभाजी घेऊन त्यात बटाटयाचा वापर आहारात वाढला आहे. पोकळा चाकवत भेंडी, पालक मेथी या भाज्या वीस रुपयांवर पोहचल्याने गृहिणींच्या बजेटला महागाईची झळ बसली आहे. मटकी मूग हरबरा या कडधान्यांचा पर्याय शोधला जात आहे.

लासलगाव, खेडची आवक घटली
सातारा जिल्ह्याला लोणंद बाजारपेठेचा कांदा वगळता लासलगाव (नाशिक) व खेड (पुणे) येथून सुमारे पाच हजार क्विंटल कांद्याची आवक होते. मात्र यंदाच्या अतिवृष्टीने कांद्याला मोठा फटका दिला. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या हंगामात खेड तालुक्‍यातून केवळ पंचवीस क्विंटल जुना कांदा पाठवण्यात आला. लासलगाव व खेडचा बराचसा जुना कांदा व्यापाऱ्यांनी सुरतकडे वळवल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील कांद्याची आवक प्रचंड घटली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.