धारदार कटर सापडल्यामुळे कारागृहाची सुरक्षा धोक्‍यात

सातारा – येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चायनीज खाद्यपदार्थ, राइस अन्‌ धारदार कटर सापडले. या घटनेमुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी कारागृह रक्षक दौलत ज्ञानू खिलारे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञातावर कारागृहाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कारागृहातील कैद्यांना बराकीत बंद करण्याचे काम बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू होते. त्यावेळी खिलारे दोन नंबर सर्कलमध्ये होते.

साडेसहाच्या सुमारास याच सर्कलमधील कैद्यांच्या आंघोळीसाठी केलेल्या पत्र्याच्या शेडजवळ एक खाकी रंगाचा पिशवी बाहेरून कोणीतरी टाकली.
खिलारे यांनी तातडीने वरिष्ठांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्या पिशवीतील साहित्याची पाहणी केली. त्यावेळी चायनीज खाद्यपदार्थ, राईस व एक धारधार कटर त्या पिशवीत आढळून आले. तसेच त्या पिशवीतील एका चिठ्ठीवर “”बाबा, तेरा तारखेपर्यंत काम झाले पाहिजे,” असे लिहले होते.

त्यानंतर खिलारे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास हवालदार सपकाळ करत आहेत. कारागृहात पडलेल्या त्या पिशवीत कटर आढळले व तेरा बारापर्यंत काम झाले पाहिजे असे लिहले असल्याने कारागृहातील कोणत्या कैद्याच्या घातपाताचा कट तरी आखला गेला नाही ना अशी चर्चा सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.