कराड – तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून, पाच जणांची तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साहिल साधमियाँ कादरी (रा. राजकोट, गुजरात) याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रामगोंडा रायगोंडा पाटील (रा. मंगळवार पेठ, कराड) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामगोंडा पाटील यांचे मित्र समीर मुल्ला यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर साहिल कादरीने त्याच्या कंपनीबाबत केलेली पोस्ट पाहिली. संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. याबाबत समीर मुल्ला यांनी रामगोंडा पाटील, संतोष पवार, मन्सूर मोमीन आणि शाहनवाज मणेर या मित्रांशी चर्चा केली. या पाच जणांनी त्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी साहिल कादरीची भेट घेण्याचे ठरवले. त्यानुसार कादरीशी मोबाइलवरून संपर्क साधून, त्याला कराडमध्ये बोलावले. वारुंजी फाट्यानजीकच्या एका हॉटेलमध्ये जुलै 2022 मध्ये साहिल कादरीची रामगोंडा पाटील व त्यांच्या मित्रांशी भेट झाली.
त्यावेळी साहिलने त्याच्या ‘ब्लॉकबिट्स’ आणि ‘बिटिका कॉइन’ या कंपन्यांची माहिती देऊन गुंतवणूक करायला सांगितले. गुंतवणुकीच्या तिप्पट पैसे मिळतील, अशी हमी साहिलने दिली. रामगोंडा पाटील आणि त्यांच्या मित्रांनी संबंधित कंपनीत 11 जुलै ते 28 ऑगस्ट 2022 या कालावधीत 30 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणुकीनंतर एक वर्षात ज्यादा परताव्यासह मूळ रक्कम परत देण्याची हमी साहिलने दिली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही मूळ रक्कम व परतावा न मिळाल्याने पाच जणांनी साहिलकडे पैशाची मागणी सुरू केली. आधी साहिलने उडवाउडवीची उत्तर देऊन, मोबाइल बंद केला.
त्यानंतर तो काही महिने फरारी होता. काही दिवसांपूर्वी रामगोंडा पाटील व त्यांच्या मित्रांचा साहिलशी संपर्क झाला. त्यावेळी, मी कोणतीही रक्कम देणार नाही, मला फोन करून पैसे मागितल्यास तुम्हाला सोडणार नाही. तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करेेन, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रामगोंडा पाटील यांनी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.