शौर्यदिनासाठी ७५०० पोलीस अधिकारी
शिक्रापूर व लोणीकंद पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयरणस्तंभ मानवंदना तसेच २०६ वा शौर्यदिन कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. सात हजार पाचशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ड्रोनद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तर दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या कार्यक्रमासाठी प्रशासन देखील सज्ज झाले असून उद्या पासून पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात होणार असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशन व पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने नियोजन केले आहे.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन जय्यत तयारी करत असते. कोरेगाव भीमा हे ग्रामीण पोलीसमध्ये तर लोणीकंद हे शहरी पोलीस विभागात गेल्याने दोन्ही ठिकाणी पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांच्या अख्यारीत तसेच जिल्हाधिकारी यांच्या देखरेखेखाली कार्यक्रम होत आहे.
याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असल्याने होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे जिकीरीचे होत असते. प्रत्येक वर्षी अधिकाऱ्यांच्या बैठका होत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो. यावर्षी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून अनुयायांना सुविधा देण्याबाबतचे नियोजन केले आहे. विजयरणस्तंभासह परिसरात सीसीटीव्ही बसवत कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वाहतुकीमध्ये मोठे बदल केले आहे.
शिक्रापूर पोलीस बंदोबस्त
अप्पर पोलीस अधीक्षक ७, उपविभागीय पोलीस अधिकारी १९, पोलीस निरीक्षक ६८, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक २१७, पोलीस कर्मचारी २४८२, एसआरपीएफ प्लाटून १२ (३६० कर्मचारी), असे एकूण ३२०७ पोलीस अधिकारी व कर्मचारी.
लोणीकंद पोलीस बंदोबस्त
अप्पर पोलीस आयुक्त ४, पोलीस आयुक्त ११, सहायक पोलीस आयुक्त ४२, पोलीस निरीक्षक ८६, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक २७१, पोलीस कर्मचारी ३२००, एसआरपीएफ कंपनी ६ (५०४ कर्मचारी), बॉम्ब शोध नाशक पथक ९ (१०० कर्मचारी), जलद शीघ्र कृती दल पथक ३ (९० कर्मचारी), असे एकूण ४३०८ पोलीस अधिकारी व कर्मचारी.