पुणे – सीएसआरचा योग्य पद्धतीने उपयोग करून शासकीय रुग्णालयही खासगी रुग्णालयांपेक्षा अधिक चांगले होऊ शकतात, याची प्रचिती ससून रुग्णालयाकडे पाहिल्यावर येते. स्वच्छता, शिस्त आणि सुरक्षितता यामुळे रुग्णालयात येणारा रुग्ण आणि नातेवाईक समाधानी होतो, अद्ययावत तंत्रज्ञामुळे उत्तम उपचार होत आहे. काम करण्याची तळमळ असेल तर बदल घडू शकतो हे ससून रुग्णालयाने दाखवून दिले. त्यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांसाठी ससून रुग्णालय हे “रोल मॉडेल’ असून, प्रत्येकांना याच तळमळीने काम केले तर नक्कीच शासकीय रुग्णालयात गरिबांसह सर्वसामान्य रुग्णही उपचारासाठी येतील, असे मत माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी एकनाथ खडसे गुरुवारी (दि.9) ससून रुग्णालयात आले होते. त्यावेळी त्यांनी रुग्णालयात अन्नछत्राला (किचन) भेट देऊन जेवणही केले. तसेच काही रुग्णांशीही चर्चा केली. त्याबाबत खडसे यांच्याशी संवाद साधला असता, मागील दहा वर्षांत ससून रुग्णालयाने कात टाकली असून खासगी रुग्णालयांना लाजवेल असे रुग्णालय झाले आहे. मी स्वत: किचनमध्ये जावून जेवण केले. रुग्णांची विचारपूस केली असता, उत्तम उपचार आणि जेवण मिळते. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळते, आणि स्वच्छता वेळच्यावेळी होते असे रूग्णांनी सांगितले.
या बदलामध्ये अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह अधीक्षक, उपअधिष्ठाता, डॉक्टर, कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. त्याला रुग्णांचीही साथ मिळत असून, भविष्यात ससूनच्या धर्तीवर सर्व शासकीय रुग्णालये झाली तर नक्कीच रुग्णांना त्याचा फायदा होईल, असे खडसे यांनी सांगितले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. हरिश टाटिया, उपअधीक्षक विजय जाधव, महेश पाटील उपस्थित होते.