पेशव्यांच्या वंशजांनाच शनिवारवाडा ‘बंदी’

मराठ्यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला महापालिकेचा पटांगण देण्यास नकार


पानिपत रणसंग्रामाला 260 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम


पेशव्यांचे वंशज आणि केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजन


एल्गार परिषदेचा अनुभव सांगत परवानगीकडे दाखवले बोट

पुणे – पानिपत रणसंग्रामाला 260 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मराठ्यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी 12 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमाला महापालिकेने शनिवारवाड्याचे पटांगण देण्याला नकार दिला आहे. पेशव्यांचे वंशज आणि थेट केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. एवढेच नव्हे तर एल्गार परिषदेचा अनुभव सांगत महापालिकेने पोलिसांच्या परवानगीकडे बोट दाखवले आहे. तर शनिवारवाडा ही मालमत्ता महापालिकेच्या ताब्यात असल्याने पोलिसांनी अभिप्राय देण्याचा संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे.

पानिपत रणसंग्रामाला 260 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 12 जानेवारी रोजी पुण्यात हिंदवी स्वराज्य महासंघ आणि केंद्राच्या सांस्कृतिक विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 ते 8 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. राजमाता जिजाऊ जयंती आणि थोरले छत्रपती शाहू महाराजांचा राज्यभिषेक दिन असे औचित्यही या कार्यक्रमाला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंजावर येथील छत्रपती घराण्याचे अधिपती श्रीमंत महाराजसाहेब शिवाजीराजे भोसले आहेत तर, प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे निमंत्रक पेशव्यांचे वंशज हिंदवी स्वराज्य महासंघाचे कार्याध्यक्ष श्रीमंत महेंद्रसिंह पेशवा हे स्वत: आहेत. असे असतानाही महापालिकेने जुन्या पत्रांचा आणि कार्यक्रमांचा दाखला देऊन या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

महासंघाने नाईलाजास्तव केलेली सूचना
महापालिका आणि पोलिसांमध्ये चाललेल्या या कलगीतुऱ्यामुळे महासंघाने नाईलाजाने निमंत्रण पत्रिकेवर एक सूचना केली आहे. त्यामध्ये “महापालिका आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्यास किंवा त्यांची संमती न आल्यास हा कार्यक्रम रमणबाग शाळेच्या फरशीच्या मैदानावर होऊ शकतो. मात्र, ते नंतर जाहीर करण्यात येईल’ असे नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.