सासवड -ज्येष्ठ वद्य द्वादशीला गुरूवारी (दि. 18) परंपरेनुसार श्री संत ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे सासवड येथून आषाढ वारीसाठी प्रस्थान झाले. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या संख्येने उपस्थित असलेल्या देवस्थान प्रमुख, दिंडी प्रमुख, मानकरी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत येथील देऊळवाड्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदार संजय जगताप उपस्थित होते.
ज्येष्ठ वद्य द्वादशी हा संत सोपानकाका महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा मुख्य दिवस असल्याने पहाटे मंदिरात पहाटे चार वाजता काकडारती, 4.30 ते 5.15 समाधी स्थळाला पवमान अभिषेक तसेच अन्य धार्मिक विधी सोहळाप्रमुख श्रीकांत गोसावी यांच्या हस्ते संपन्न झाले. ज्येष्ठ वद्य द्वादशी हा दिवस संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस असल्याने वीणामंडपात हभप संभाजी महाराज बडदे यांचे समाधीवर्णनाचे कीर्तन झाले.
यानंतर श्रींचा नैवेद्य, महाप्रसाद झाल्यानंतर दुपारी तीननंतर दिंडी प्रमुख, मानकरी यांना देऊळवाड्यात घेण्यात आले. त्यावेळी शासनाच्या नियमांचे पालन करत प्रत्येकाची थर्मल तपासणी करण्यात आली. दुपारी चार वाजता प्रथेप्रमाणे मानाच्या अभंगांने सुरुवात होऊन प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. दरम्यान, देवस्थानचे अध्यक्ष ऍड. गोपाळ गोसावी यांच्या देवघरातील चल पादुकांचे सुवासिनींनी औक्षण केल्यानंतर मानकरी अण्णासाहेब केंजळे महाराज यांनी पादुका आणून वीणामंडपातील पालखीमध्ये विधीवत स्थानापन्न केल्या.
त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व दिंडी प्रमुख, मानकरी व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर टाळ, मृदंगाच्या गजरात पादुकांची पालखीतून एक मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी वीणामंडपात ठेवण्यात आली. दि. 29 जूनपर्यंत पालखी वीणामंडपातच राहणार असल्याची माहिती सोहळा प्रमुख श्रीकांत गोसावी यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके आदींनी याप्रसंगी उपस्थित दाखवली. संत सोपानकाका सहकारी बॅंकेच्या वतीने मंदिरात व पालखीला फुलांची सजावट करून रांगोळी रेखाटण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे प्रस्थानसमयी यंदाही वरूणराजाने न चुकता आपली हजेरी लावली.
30 जूनला चलपादुका पंढरपूरकडे
देऊळवाड्यात दैनंदिन विधी संपन्न होणार आहेत. 30 जूनला संत सोपानकाकांच्या चल पादुका सकाळी 10 वाजता खासगी गाडीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतील. तेथील दोन दिवसांच्या विविध धार्मिक कार्यक्रमानंतर हा सोहळा आषाढ शुद्ध द्वादशीला (दि. 2 जुलै) सायंकाळी सासवड मुक्कामी पोहोचेल, असे गोपाळ गोसावी व श्रीकांत गोसावी यांनी सांगितले.