रोजचा आकडा कमी दाखविण्याचा प्रयत्न : डॅशबोर्ड आणि प्रसिद्धीपत्रकात तफावत
करोनाची एका दिवसात शंभरी पार : शहरातील दोघांचा आणि शहराबाहेरील एकाचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महापालिका प्रशासनाकडून जाहिर करण्यात येणाऱ्या आकडेवारीमध्ये गोंधळ आहे. गुरुवारी करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. एकाच दिवशी 122 जणांना करोनाची लागण झाली. मात्र प्रसिद्धीपत्रकामध्ये 101 रुग्णसंख्या देण्यात आली. संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते. ज्या दिवशी रुग्णसंख्या शंभरीकरडे वाटचाल करते त्यावेळी प्रशासन शक्कल लढवून प्रसिद्धीपत्रकात कमी आकडेवारी देते. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीच्या आकडेवारीसह पुन्हा काही रुग्णसंख्या राखीव ठेवली जाते. प्रशासनाकडून सुरु असलेल्या या प्रकारामुळे “करोना’चा प्रकोप घटेल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
करोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबत महापालिका प्रशासनाकडून लपवाछपवी केली जात आहे. रुग्णसंख्या जाहीर करण्याबाबत जाणूनबुजून टाळाटाळ केली जाते. महापालिकेच्या संकेतस्थळावरीलर् “डॅशबोर्ड’वर वेगळी आणि प्रसिद्धीपत्रकात वेगळी आकडेवारी देत “करोना’चा प्रकोप कमी करुन दाखविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. तर अनेकवेळा करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे असे लक्षात आल्यावर संकेतस्थळावरून डॅशबोर्ड गायब होत असल्याने शंका उपस्थित केली जात आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्ड व प्रसिद्धीपत्रकात येणाऱ्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळते.
अशा पद्धतीने आकडेवारी लपवून करोना थांबणार आहे का याचा विचार प्रशासनाने करणे आवश्यक आहे. करोनाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करणे, प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. अशाप्रकारे करोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी लपवून करोना थांबणार नाही.
सर्वाधिक रुग्णवाढ
गुरुवारी शहरातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदविण्यात आली. डॅशबोर्डनुसार आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 1495 झाली आहे. तर प्रेसनोटमध्ये हा आकडा 1474 दर्शविण्यात आला आहे. यानुसार बुधवारचा 1373 हा आकडा पाहता डॅशबोर्डनुसार गेल्या 24 तासात 122 रुग्णांची वाढ झाली आहे. तर प्रेसनोटनुसार 101 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हा आजपर्यंतचा सर्वांत उच्चांकी आकडा आहे. शहरातील अनेक भागांमध्ये आज करोनाचे रुग्ण आढळले त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. करोना रुग्णांची एकूण संख्या पंधराशेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्यामध्ये गुलाबनगर दापोडी येथील 65 वर्षीय व दिघी येथील 43 वर्षीय दोन पुरुषांचा मृत्यू झाला. तसेच शहराबाहेरील शिरपूर धुळे येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचाही मृत्यू झाला. शहरातील मृतांची संख्या 26 झाली आहे.
दिवसात 95 रुग्णांना डिस्चार्ज
आज दिवसभरात 95 करोनाबाधित रुग्णांना घऱी सोडण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शहरातील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. आज पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, काळेवाडी, दिघी, खराळवाडी, रहाटणी, खडकी, पिंपळे गुरव या भागातील नागरिकांना घरी सोडण्यात आले. एकाच दिवशी एवढ्या रुग्णांना घरी सोडल्याने करोनामुक्तरुग्णांची संख्या 924
झाली आहे.
जिल्हा रुग्णालयात तीन बाधित, दोन मुक्त
सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल संशयित करोना रुग्णांपैकी गुरुवारी (दि. 18) तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर, दापोडीतील दोघे रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. बाधित रुग्ण पुणे, भोर आणि औंध येथील रहिवाशी आहेत. पुणे-महात्मा फुले पेठ येथील 75 वर्षीय वृद्धासह भोर आणि औंध येथील अनुक्रमे 32 आणि 46 वर्षीय पुरुषाचा करोनाबाधितांमध्ये समावेश आहे. करोनामुक्त झालेले दापोडीतील दोघे हे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामध्ये 40 वर्षीय पुरुष आणि 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे. रुग्णालयामध्ये आज 6 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या 24 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत 58 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.