शेवगाव – आषाढी एकादशीनिमित्त प्रत्येक वर्षी पंढरपूरला जाणारी पैठण येथील श्री संत एकनाथ महाराजांची पालखी आज (रविवारी) तालुक्यातील हातगाव येथे दुसऱ्या मुक्कामी येत असून, या सोहळ्यामध्ये पालखीसोबत येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेचा आढावा गटविकास अधिकारी दीप्ती गाठ व नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी काल (शनिवार) घेऊन काही सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सरपंच अरुण मातंग व ग्रामसेवक सुनील गोरे यांनी दिली.
पैठण येथून पंढरपूरकडे निघालेली नाथाची पालखी उद्या हातगाव मुक्कामी असते. पालखी सोबत जाणाऱ्या भाविक भक्तांना भोजन व निवास व्यवस्था असावी, या उद्देशाने गाठ व सानप यांनी हातगाव येथे भेट देऊन 2 मंगल कार्यालयांसह प्राथमिक शाळा व प्रसादगिरी महाराज मठ यासह गरज भासल्यास इतर काही ठिकाणी मुक्कामी कसे राहता येईल, याबाबत सविस्तर सूचना दिल्या. या वेळी सरपंच मातंग, ग्रामसेवक गोरे, चरणसिंग परदेशी, बंडू हागे, रामेश्वर घुले, बदाम पंडित, कोतवाल ज्ञानदेव मातंग, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.