जेजुरी (ता. पुरंदर) : लवथळेश्वर येथील ओढ्यात कमी व्यासाचे पाइप टाकण्यात आले आहेत.
जवळार्जुन – पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी उपजिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी महामार्गासाठी जागा संपादित करण्यात आली. त्याअनुषंगाने कामाला सुरुवात झाली आहे; परंतु पालखी महामार्गाचे काम करणार्या ठेकेदाराकडून अधिकची जागा संपादित करत मनमानी व चुकीच्या पद्धतीने काम केले जात आहे.
या कामासंदर्भात स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता व कामासंदर्भात कोणतीही माहिती न देता हे काम ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने सुरू असल्याचे संतोष बयास, ऋषिकेश जगताप, रमेश लेंडे, साहिर शेख, प्रवीण शेरे, रमेश पवार यांनी सांगितले. जेजुरी येथे सुरू असलेल्या लवथळेश्वर परिसरात गटारे रस्त्यापासून उंच करण्यात आली असल्याने रस्त्याच्या कडेला असणार्या सर्व घरांमध्ये पावसाचे पाणी साठणार आहे. अगोदरच या परिसरात रस्त्याच्या खाली अनेकांची घरे आहेत.
लवथळेश्वर येथील ओढ्यात कमी व्यासाचे पाइप टाकण्यात आले आहेत ते पाइप काढून मोठे पाइप टाकणे आवश्यक आहे. ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. नगरपालिका व स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन व त्यांच्या म्हणण्यानुसार ठेकेदाराकडून काम न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले जाईल, असे संतोष बयास, प्रवीण शेरे, रमेश लेंडे, ऋषिकेश जगताप, रमेश पवार यांनी सांगितले.