मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या समोर नव्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचलेच नसल्याची धक्कादायक वृत्त माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करताना, “सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचे याची त्यांनी माहिती असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अशी मागणीदेखल त्यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर नव्याने आरोप करत ‘आएनएस विक्रांत फाइल्स’ उघड केली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत ही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले. ही माहिती मागील महिन्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले.
आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याविरोधात किरीट सोमय्या यांनी आंदोलन केले होते. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी लोकांकडून निधी जमवला होता. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली होती. या दरम्यान 57 ते 58 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला होता. सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेतेदेखील सहभागी होते. मात्र, या भ्रष्टाचाराच्या कटाचे प्रमुख सोमय्या होते असा आरोप संजय राऊत यांनी केला. सोमय्या हे सीए असल्यामुळे या पैशांचे काय करायचे हे त्यांना ठाऊक असल्याचेही राऊत यांनी म्हटले.
किरीट सोमय्या यांनी विक्रांतच्या नावाखाली जमवलेला निधी हा आपल्या मुलाच्या कंपनीत गुंतवला आणि त्यांच्या निवडणुकीतही वापरला असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. या प्रकरणाची आयकर विभाग, ईडी, सीबीआयने चौकशी करावी अशीही मागणी राऊत यांनी केली. देशाच्या नागरिकांच्या भावनांशी खेळून, देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावर हा निधी जमवण्यात आला आणि त्याचा अपहार करण्यात आला. त्यामुळे सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो असेही राऊत यांनी म्हटले.