सातारा -सातारा शहरात करोनाचे संक्रमण वाढत असताना महिला सफाई कामगारांच्या “काम बंद’ आंदोलनामुळे शहरातील वार्डांची सार्वजनिक स्वच्छता ठप्प झाली आहे. शहरात कोठेही स्वच्छता न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
तब्बल दोनशे कंत्राटी सफाई महिला कामगारांनी पगार होईपर्यंत कामावर न येण्याचा निर्णय घेत “काम बंद’ आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. सातारा शहराची सार्वजनिक स्वच्छता चार ठेकेदारांच्या कंत्राटी कामगारांकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, कोविड निर्मूलन व कर्मचाऱ्यांचे पगार यामध्ये वित्त आयोगाचे अनुदान खर्च होत असल्याने ठेकेदारांची तब्बल तीन कोटी रुपयांची बिले अडकून पडली आहेत.
ठेकेदारांनाच स्वच्छता ठेक्यांचा मेहनताना न मिळाल्याने कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे पाच महिने वेतन करण्यात आलेले नाही. त्यामुळे संबधित महिलांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून पालिका प्रशासनाला इशारा दिला होता. परिणामी शनिवारी संपूर्ण शहराची स्वच्छताच ठप्प झाली. कोणत्याही वॉर्डातील गल्लीबोळात अथवा वर्दळीच्या चौकात झाडू चालला नाही.
बारटक्के चौक, समर्थ मंदिर चौक, गोलबाग परिसर, सदाशिव पेठ भाजी मंडई, जुना मोटार स्टॅंन्ड, चांदनी चौक तसेच बहुतांश ठिकाणी सफाईच झाली नाही. गवंडी बोळात कचऱ्याचे ढीग मात्र तसेच पडून होते. ठिय्या आंदोलनात केवळ 40 ते 50 महिला सहभागी झाल्या होत्या. मात्र, शनिवारी सर्व सफाई महिला कामगारांनी एकमेकींशी समन्वय करून शंभर टक्के बंद घडवला.
करोना संक्रमणाचे साताऱ्यात सत्र सुरु असताना शहराची स्वच्छता व्यवस्था अचानक संपावर गेल्याने नागरिक तसेच व्यापारी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली.पालिकेच्या आस्थापनेवरील सफाई कामगार वर्ग कोविड प्रतिबंध मोहिमेत गुंतल्याने शहराच्या स्वच्छतेच्या सगळा भार कंत्राटी कामगारांवर पडला आहे.
मात्र, त्यांच्या वेतनाची व्यवस्था न झाल्याने सफाईच्या कामाची टाळेबंदी सातारकरांच्या जीवावर बेतू शकते. वेतन झाल्याशिवाय कामावर परतायचे नाही, असा पवित्रा सफाई कामगारांनी घेतल्याने शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.
ठेकेदारांचे मौन
या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष गणेश दुबळे यांनी केले होते. दुबळे यांच्यासह आंदोलक महिलांनी मुख्याधिकारी रंजना गगे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी ही अडचण ठेकेदारामुळे निर्माण झाली आहे. सफाई कामगारांच्या तक्रारी तुम्ही त्यांना सांगा, असे नियमावर बोट ठेवले. सफाई कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.