टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्यातील घुमनदेव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी येथील पशू वैद्यकीय डाॅ. विकास नवले यांनी २०० फुट बोअरवेल घेऊन दिल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
घुमनदेव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेसाठी काहीतरी केले पाहिजे या हेतूने प्रेरीत होऊन डाॅ. नवले यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी येथील शाळेसाठी २०० फुट बोअरवेल मारून दिला. या बोअरवेलला दीड इंच पाणी लागल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचा ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र दिनी डाॅ.विकास बाबासाहेब नवले यांच्याहस्ते ध्वजारोहन करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्याहस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता ४ थी व ५ वी शिष्यवृत्तीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आबासाहेब शिंदे, सरपंच श्रीपत गायकवाड, उपसरपंच गिताराम जाधव, बाळासाहेब कांगुणे, अशोक गायकवाड, दीपक तांदळे, गणेश शिंदे, भारत जाधव, ग्रामसेवक विधाते, कय्यूमभाई, आप्पा जाधव, गायकवाड आदीसह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक आनंद वाघ यांनी केले. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका महापुरे यांनी मानले.