पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये तिघे पुण्यातील तर एक रहाटणीतील रूग्ण
पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात आज आणखी चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे करोना बाधितांचा आकडा वाढून 59 पर्यंत पोहचला आहे. तर, आज दोन महिला रुग्णांना “डिस्चार्ज’ देण्यात आला.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये तिघे पुण्यातील आहेत. त्यातील 47 आणि 69 वर्ष वयाचे पुरूष रुग्ण आहेत. तर, 65 वर्ष वयाची महिला रुग्ण आहे. तर, रहाटणी येथील 38 वर्ष वयाची महिला रुग्ण आहे. रुग्णालयातून आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पुणे-मंगळवार पेठ येथील 65 वर्षीय महिला आणि जुनी सांगवी येथील 38 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या दोन्ही महिलांच्या 14 दिवसानंतर घेतलेल्या सलग दोन करोना चाचण्या निगेटिव्ह आल्या. त्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आले. रुग्णालयामध्ये आज पुणे, पिंपरी-चिंचवड, खेड, जुन्नर, बारामती आणि मुंबई येथील 21 संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 59 रुग्णांना करोनाची लागण झाली. त्यातील 23 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 6 रुग्ण अत्यवस्थ आहेत. 8 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर, 5 रुग्ण सिम्बोयसिस रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे.