श्री श्री रवीशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी – छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवीशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून पोलीस टाळाटाळ करीत आहेत. उद्या (दि. 9) सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल न केल्यास मंगळवारपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवीशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाबाबत जाणीवपूर्वक प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. शिवाजी महाराज यांना कमी लेखून रामदास स्वामींचे उदात्तीकरण करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या श्री श्री रवीशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने 2 जानेवारी 2020 रोजी पोलिसांना निवेदन देण्यात आले. मात्र प्रत्येकवेळी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत.
याच मागणीसाठी येत्या मंगळवारपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतीश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, संघटक ज्ञानेश्वर लोभे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.