हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश भदौरिया यांचे मत
पुणे – आजची युद्धभूमी गुंतागुंतीची आणि बहुआयामी होत असून, सुरक्षेबाबतची अनपेक्षित स्थितीदेखील निर्माण होत आहे. विविध पातळ्यांवरील “हायब्रीड’ धोक्यांवर मात करण्यासाठी लष्करी दलांनी सज्ज असले पाहिजे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) आणि डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स (डीएमए) या दोन्हीची सुरूवात ही देशाच्या संरक्षण क्षेत्रातील बदलांमधील ऐतिहासिक बाब आहे, असे मत हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) शुक्रवारी झालेल्या 139 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनावेळी भदौरिया बोलत होते. विज्ञान शाखेचे 49, संगणक विज्ञान शाखेचे 113 आणि कला शाखेच्या 55 अशा एकूण 217 कॅडेटना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी देण्यात आली.
एनडीए ही केवळ नेतृत्वाचे उगमस्थान नाही. तर संयुक्ततेचे उगमस्थान आहे. एनडीएमधील संयुक्ततेचे प्रशिक्षण घेण्याचा अनुभव संबंधित संस्थांमध्ये देखील पुढे नेणे आवश्यक आहे. अनपेक्षित सुरक्षेचे प्रसंग आणि अधिक “ऑपरेशनल टेम्पो’ समावेश असणारी आजची युद्धभूमी अत्यंत गुंतागुंतीची आणि बहुआयामी झाली आहे. युद्धभूमीत “ऑपरेशनल रिस्पॉन्स’ आणि मागणी हा एकात्मिक समन्वयवादी दृष्टीकोन असेल, असे भदौरिया म्हणाले.
तुमचे “कोर्समेट’, “स्क्वॉड्रनमेट’बरोबर निर्माण होणारे मैत्रीचे बंध तुमच्या करिअरमध्ये कायम ठेवले पाहिजे. करिअरच्या प्रत्येक टप्प्यात त्याला समन्वयामध्ये रुपांतरित करणे देखील आवश्यक असल्याचा भदौरिया यांनी विद्यार्थ्यांना दिला. लष्करातील नवीन कामात आपल्या शेजारील सुरक्षेच्या वातावरणाचा थेट परिणाम होणाऱ्या जगभरातील भौगोलिक मंथन समजावून घेत सुरूवात केली पाहिजे, असे भदौरिया यांनी नमूद केले.