देहूगाव (वार्ताहर) – करोना महामारीमुळे मागील दोन वर्षे वारकऱ्यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पायी वारी सोहळा अनुभवता आला नाही. परंतु यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी वैष्णवांना हा पालखी सोहळा याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. यंदा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याला श्रीक्षेत्र देहूगाव येथून ज्येष्ठ वद्य सप्तमी सोमवार 20 जून रोजी प्रस्थानाने प्रारंभ होणार आहे.
23 जूनला पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी पोहोचेल तर 9 जुलैला पंढरपूरला पोहचणार आहे. हा पालखी सोहळा 13 जुलैला परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार असून, सोहळ्याची 24 जुलैला देहूच्या मुख्य मंदिरात समारोप होणार आहे. करोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून पालखी सोहळा मोजक्याच वारकऱ्यांमध्ये झाला होता. यंदा तुकोबारायांचा पालखी सोहळा पायी वारी होत असून, पालखी मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने थोडाफार वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार असल्याची माहिती श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांनी पालखी सोहळा प्रमुख हभप संतोष महाराज मोरे, हभप विशाल महाराज मोरे, हभप माणिक मोरे, विश्वस्त हभप संजय मोरे, हभप भानुदास मोरे, हभप अजित महाराज मोरे यांच्या उपस्थितीत देण्यात आली आहे.
संस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी (दि. 8) सकाळी मुख्य मंदिराच्या कार्यालयात जाहीर करण्यात आला आहे. पालखी सोहळ्याच्या तयारीला प्रारंभ करण्यात आला आहे. नैमित्तिक कामे संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली आहेत. परंपरेनुसार यंदा पालखी सोहळा पंढरपूर मार्गस्थ होत असताना पुणे येथील नाना पेठेतील श्री निवंडुंगा विठ्ठल मंदिरात दोन मुक्काम होतील तर यंदा इंदापूर येथे पालखी तळावर दोन मुक्काम होणार आहेत. प्रत्येक ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या दरम्यान प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले, तर इंदापूर नंतर सराटी येथील अकलूज माने विद्यालय जवळ गोल रिंगण होणार आहे. माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी येथे पादुका आरती येथे भाविकांना उभे रिंगण पहायला मिळणार आहे.
पालखी मार्ग
20 जून सोमवार रोजी देहूतील मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान कार्यक्रम होणार आहे. पहिला मुक्काम श्रीक्षेत्र देहूगाव येथील इनामदार साहेब वाड्यात होईल. 21 जून आकुर्डी विठ्ठल मंदिर, 22 व 23 जून श्री निवंडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ पुणे, 24 जून लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिर, 25 जून यवत (पालखी तळ, श्री भैरवनाथ मंदिर ), 26 जून वरवंड (श्री विठ्ठल मंदिर), 27 जून उंडवडी गवळ्याची, 28 जून बारामती शारदा विद्यालय, 29 जून सणसर (पालखी तळ), 30 जून दुपारचे बेलवडी गोल रिंगणनंतर आंथर्णे (पालखी तळ), 1 जुलै निमगाव केतकी (पालखी तळ), 2 जुलै इंदापूर येथे (गोल रिंगण) इंदापूर (पालखी तळ) येथे दोन दिवस, 4 जुलै सराटी, 5 जुलै अकलूज (माने विद्यालय येथे गोल रिंगण नंतर (पालखी तळ), 6 जुलै माळीनगर येथे उभे रिंगण बोरगाव (पालखी तळ),
7 जुलै तोंडले बोंडले येथे धावा, पिराची कुरोली गायरान (पालखी तळ), 8 जुलै बाजीराव विहीर येथे उभे रिंगण, वाखरी (पालखी तळ) येथे मुक्काम करणार 9 जुलै रोजी पादुका आरती येथे उभे रिंगण झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून रात्री पंढरपूर शहरात श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे. तर 10 जुलैला नगर प्रदक्षिणा करून पालखी 13 जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. 13 जुलैला दुपारी पंढरपूर वरून परतीच्या प्रवासाला सुरूवात करणार आहे.
परतीचा प्रवासातील मुक्काम
13 जुलै वाखरी, 14 जुलै महाळुंगे (श्री विठ्ठल मंदिर), 15 जुलै वडापुरी, 16 जुलै लासुर्णे (श्री महादेव मंदिर), 17 जुलै बऱ्हाणपूर श्री मारुती मंदिर), 18 जुलै हिंगणीगाडा, 19 जुलै वरवंड, 20 जुलै उरूळी कांचन, 21 व 22 जुलै नवीपेठ पुणे येथील श्री विठ्ठल मंदिर, 23 जुलै पिंपरी गाव येथील श्री भैरवनाथ मंदिर, 24 जुलै रोजी श्री क्षेत्र देहूगाव येथे पालखी सोहळ्याची सांगता होईल.
वारीचे मार्गक्रमण
– 20 जून सोमवारी, पालखी सोहळा प्रस्थान (देहू मुख्य मंदिर)
– 9 जुलै, शनिवारी, सायंकाळी पालखी सोहळा पंढरपूर येथे पोहचेल.
– 13 जुलै बुधवारी दुपारी (परतीच्या प्रवासासाठी) पालखी सोहळा पंढरपूर येथून देहूकडे प्रस्थान.
– 24 जुलै, पालखी सोहळ्याची सांगता. देहू मुख्य मंदिर.