आयपीएल स्पर्धेत काही कथा अशा समोर येतात की त्याची माहिती घेतल्यावर असे लक्षात येते की आपण स्वतःच्या नशिबाला किती दोष देतो. या उलट काही खेळाडू या स्तरावर कसे पोहोचले ते पाहिले की आपल्या व्यथा त्यांच्यासमोर फिक्या पडतात. वेस्ट इंडीजचा अष्टपैलु क्रिकेटपटू व यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असलेला रॉमन पॉवेल असाच एक खेळाडू.
वेस्ट इंडीजचा हा अवघ्या 28 वर्षांचा खेळाडू यंदाच्या स्पर्धेत अचानक नावारुपाला आला. त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याच्या वादळी फलंदाजीनेच तो भारतातच नव्हे तर संपूर्ण जागतिक क्रिकेटमध्ये लोकप्रिय झाला. 2015 साली लीस्ट ओ स्पर्धेत चमक दाखवत तो वेस्ट इंडीजच्या अंतर्गत स्पर्धांमध्ये चांगलाच चर्चेत आला. यानंतर पाकिस्तानविरुद्ध 2017 साली टी-20 सामन्यांत पदार्पण करत व त्यात अफलातून कामगिरी करत तो वेस्ट इंडीजच्या टी-20 संघात दाखल झाला. त्यापूर्वीच त्याने 2016 साली श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले होते. मात्र, टी-20 मध्येच त्याची गुणवत्ता जगासमोर आली. मात्र, या व्यासपीठावर आपण केवळ आपल्या आईच्या प्रेमामुळे व प्रचंड त्यागामुळेच पोहोचले असे सांगताना तो एका मुलाखतीत भावुक झाला व त्याला आपले अश्रू रोखता आले नाहीत.
प्रत्यक्ष सामन्यात फलंदाजी करताना मोठ मोठ्या गोलंदाजांच्या चेंडूवर कधी तो बावरला नाही. पण आईची आठवण काढताच एखाद्या लहान मुलाप्रमाणे तो चक्क रडला. जोआन प्लेमेर या त्याच्या आईवर गर्भपात करण्याची वेळ आली होती. मात्र, अत्यंत कष्ट करुन तिने रॉमनला जन्म दिला. त्याला वाढवण्यासाठी अनेकांच्या घरी मोलकरीण म्हणून काम केले. एकवेळच्या जेवणाची भ्रांत असतानाही तिने आपल्या मुलाच्या क्रिकेटच्या आवडीसाठी अपार यातना भोगल्या, कष्ट केले व रॉमनला वाढवले. केवळ वाढवलेच नाही तर आपल्या मुलाने जागतिक स्तरावर त्याच्या आवडीच्या क्रिकेटमध्ये जग पादाक्रांत करावे यासाठी तिने आपल्या गरिबीशी जिद्दीने लढा दिला.
तिच्या अपार प्रेम व त्यागामुळेच आज पॉवेल जागतिक कीर्तीचा खेळाडू म्हणून जगासमोर आला. शालेय शिक्षणाबरोबरच त्याच्या खेळाला संपूर्ण पाठींबा देणाऱ्या आपल्या माऊलीचा उल्लेख केल्यावर भावनाविवश होणारा पॉवेल येत्या काळात वेस्ट इंडीजचाच नव्हे तर आयपीएलसह जगभरात होत असलेल्या सगळ्या टी-20 लीगचा पहिल्या पसंतीचा खेळाडू ठरेल यात शंका नाही.