कोळकी – भागवत धर्माचे प्रचारक, संत शिरोमणी नामदेव महाराजांची 753 वी जयंती, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माउलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा आणि शिख धर्म संस्थापक गुरुनानकदेव यांची 554 वी जयंती यानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या 2100 किलोमीटरच्या रथ व सायकलयात्रेचे ऐतिहासिक फलटणनगरीत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यात्रेचे हे दुसरे वर्ष आहे.
शिंपी समाजातील मान्यवर सुभाष भांबुरे, नूतन अध्यक्ष राजेश हेंद्रे, उपाध्यक्ष मृणाल पोरे, नामदेव समजोन्नती परिषदेचे फलटण शहराध्यक्ष करण भांबुरे, उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, मोहन जामदार, राजेंद्र गाटे, विजय उंडाळे, सुनील पोरे, मनीष जामदार, शेखर हेंद्रे, विजय कुमठेकर, राहुल जामदार, मनोहर जामदार, संत नामदेव महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. पद्मा टाळकुटे, उपाध्यक्ष सौ. अंजली कुमठेकर आणि समाजातील बंधू-भगिनी उपस्थित होत्या.
शांती, समता आणि बंधूता या संत विचारांच्या आणि संत साहित्याच्या प्रचार व प्रसारासाठी भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी, घुमान आणि देशभरातील नामदेव शिंपी समाज संघटनांच्यावतीने संत नामदेव महाराजांची जन्मभूमी पंढरपूर ते कर्मभूमी घुमान, अशी रथ व सायकलयात्रा काढण्यात आली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान व गुजरात या राज्यांचा एक महिन्याचा दौरा करून, ही यात्रा महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी असलेल्या फलटणमध्ये शुक्रवारी (दि. 22) दाखल झाली. नाईक निंबाळकर घराण्याच्या श्रीराम मंदिरात रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. तेथे संत नामदेव महाराजांच्या पादुकांची पूजा आणि आरती केल्यानंतर श्रीराम मंदिर ते श्री विठ्ठल मंदिर अशी रथयात्रा काढण्यात आली. रथयात्रेच्या मार्गावर शिंपी समाजातील सुवासिनींनी सडा, रांगोळी टाकून आणि पंचारतीने ओवाळून स्वागत केले.
विठ्ठल मंदिरात पादुकांची पूजा व अभिषेक राजेश हेंद्रे यांनी सपत्नीक केला. या यात्रेतील सहभागी सायकलस्वार आणि भजनी मंडळांच्या सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे आणि वारकरी उपस्थित होते.