साबळेंच्या खासदारकीचा पत्ता कट?

प्रदेश भाजपातील नेत्यांचे दुर्लक्ष : शहर पातळीवरीलही वादाचा फटका

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी (भाजपा) नेते तथा राज्यसभेचे सदस्य अमर साबळे यांची मुदत येत्या 2 एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्‍यता धुसर आहे. पक्षातील माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा “उदय’ हा साबळेंसाठी अडचणीचा ठरला असून, राज्यसभेच्या स्पर्धेतून अमर साबळे यांचा पत्ता कट झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शहरातील एक खासदार कमी होणार आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या अमर साबळे यांची सहा वर्षांपूर्वी राज्यसभेच्या खासदारपदी वर्णी लावण्यात आली होती. त्यावेळी राज्यातून सात जणांची निवड राज्यसभेवर झाली होती. या सर्वांचा कालावधी येत्या 2 एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. यामध्ये भाजपाचे तीन, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. या सातही जागांसाठी आता निवडणूक होत आहे. भाजपाच्या तीन सदस्यांपैकी अमर साबळे हे एक आहेत. यावर्षी या तीनही जागांवर भाजपाकडून उमेदवार दिले जाणार आहेत; मात्र साबळे यांच्या जागी उदयनराजे यांचे नाव जवळपास निश्‍चित मानले जात आहे.

उदयनराजे भोसले यांचे पुनर्वसन करण्यासाठी अमर साबळे यांचा पत्ता कट झाल्याचे आता निश्‍चित झाले आहे. मागासवर्गीय समाजातील नेता, मुंडे यांचे समर्थक आणि अभ्यासू या बाबींचा विचार करून साबळे यांना राज्यसभेत पाठविण्यात आले होते. मात्र राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांची कारकिर्द अपेक्षेप्रमाणे झाली नाही. देशपातळीवर राज्याचे अथवा समाजाचे प्रश्‍न मांडण्यात त्यांना अपेक्षित यश आले नाही. त्यातच शहर पातळीवरही आपली ताकद वाढविण्यात ते कमी पडले. गट-तटाच्या राजकारणाचीही किनार त्यांच्या राज्यसभेवर गंडांतर येण्यावर असल्याचे बोलले जात आहे. साबळे यांना राज्यसभेची संधी न मिळाल्यास शहरातील एक खासदारही कमी होणार आहे.

भाजपाचीही गोची
रिपाईंचे नेते रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठवावे लागणार आहे. तर तिसरी जागा ही उद्योजक अथवा सर्वसमावेशक नेत्याला मैदानात उतरवून जिंकावी लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या जागेवर साबळे यांना उमेदवारी देण्यात प्रदेश भाजपालाही अडचणी आहेत. अत्यंत आश्‍चर्यकारक एखादी घटना घडल्यानंतरही साबळे यांच्या नावाचा विचार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

तगड्या समर्थनाचा अभाव
राज्यसभेचे सदस्य म्हणून काम करताना अमर साबळे देश अथवा राज्यपातळीवरील ताकदवर नेत्यांचे समर्थन मिळविण्यात कमी पडले. त्यामुळे साबळे यांचे नाव लावून धरणारा नेताच पक्षात राहिलेला नाही. मुंडे गटाचे ते कट्टर समर्थक आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव आणि राज्यातील गेलेली सत्ता या बाबीही साबळे यांचा पत्ता कट होण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्याचे मानले जात आहे. त्यामुळे साबळे यांचे तगडे समर्थन करणारा नेताच त्यांच्या पाठीशी नसल्याची बाबही समोर आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.