बेवारस वाहनांचा प्रश्‍न सुटणार

25 लाखांचा खर्च : शहरातील बेवारस वाहने उचलणार ‘टोईंग व्हॅन’

पिंपरी – शहरामध्ये अनेक रस्त्यांवर, गल्यांमध्ये बेवारस वाहने महिनों-महिने पडून आहेत. ही वाहने महापालिकेच्या सहकार्याने पोलीस उचलणार आहेत. शहरात सुमारे तीन हजार बेवारस वाहने असून ही वाहने टोईंग व्हॅनद्वारे उचलली जाणार असून मोशीतील कचरा डेपोच्या बाजूच्या महापालिका ताब्यातील जागेत ही वाहने ठेवण्यात येणार आहेत. हे काम दोन एजन्सीला विभागून देण्यात आले आहे. त्यासाठी 25 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रस्त्यावर बेवारस वाहने लावलेली आहेत. या वाहनांमुळे शहरातील अस्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. ही वाहने नागरिकांना जाता-येता अडथळा निर्माण करतात. तसेच अनेक ठिकाणी वाहने रस्त्यांच्या बाजूला असल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा होतो. पोलिसांच्या सर्व्हेमध्ये तब्बल अडीच ते तीन हजार बेवारस वाहने असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार महापालिकेने ही बेवारस वाहने उचलण्याकरिता टोईंग व्हॅन वाहने पुरविणाऱ्या संस्थांकडून दर मागविले होते. त्यामध्ये समीर एंटरप्रायजेस, महाराष्ट्र क्रेन सर्व्हिस, साई क्रेन सर्व्हिस आणि सिटी क्रेन सर्व्हिस या चार जणांनी महापालिकेला दर सादर केले होते. यानंतर झालेल्या पत्रव्यवहारानंतर अंतिम निर्णय घेण्यात आला असून साई क्रेन सर्व्हीसेस आणि समीर एंटरप्रायजेस यांना बेवारस वाहने उचलण्याकरिता भाडेतत्वार स्वयंचलित टोईंग वाहने पुरविण्याचे काम विभागून देण्यात येणार आहे. त्यासाठी 25 लाख रुपये खर्च अपेक्षित असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आयत्यावेळी दाखल केला आहे.

बेवारस वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बेवारस वाहने आहेत. काळेवाडी, निगडी, चिंचवड, पिंपळे गुरव येथील कवडेनगर, सागंवी या परिसरामध्ये रस्त्याच्याकडेला बेवारस वाहने आहेत. या वाहनांच्या मालकांना शोधण्यात पोलिस प्रशासनालाही अपयश आले आहे. यामधील अनेक वाहने ही गंभीर गुन्ह्यामध्ये वापरले असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच, या वाहनांचा वापर अवैध धंद्यांसाठी केला जात आहे. त्यामुळे ज्या भागामध्ये अशा प्रकारची वाहने आहेत. तेथील सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. मात्र आता हा प्रश्‍न निकाली निघणार आहे.

पोलिसांच्या सर्व्हेनुसार शहरामध्ये आज अडीच ते तीन हजार बेवारस वाहने आहेत. सर्वात प्रथम ही बेवारस वाहने उचलण्याचे काम करण्यात येणार आहे. मोशी कचरा डेपोच्या शेजारील जागेवर ही वाहने ठेवली जाणार आहे. टोईंग व्हॅनची यंत्रणा आणि जागा पोलिसांना दिली जाणार आहे. गाड्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाची राहणार आहे.
– श्रीकांत सवणे, सह-शहर अभियंता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.