वारसॉ, (पोलंड) – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या एका वक्तव्यामुळे नाटोच्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बोलताना ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाने काय वाट्टेल ते करावे, असे मत व्यक्त केले होते. यावर नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टेन्बर्ग यांनी चिंता व्यक्त केली आहे.
नाटोचे जे सदस्य स्वतःचे संरक्षण करू शकत नाहीत, त्यांच्याबाबत रशियाने काय वाट्टेल ते करावे. जे देश आपल्या संरक्षण खर्चाचे उद्दिष्ट देखील गाठू शकत नाही, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी नाटोने घेता कामा नये. ही जबाबदारी स्वीकारताना अमेरिकेसह नाटोच्या अन्य सदस्य देशांनी आपले सैन्य धोक्यात घालता कामा नये, असे धक्कादायक विधान ट्रम्प यांनी अलिकडेच केले होते.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे पोलंडमध्ये चिंता निर्माण झाली, रशिया आणि युक्रेनचे युद्ध पोलंडच्या सीमेवरच सुरू आहे. युक्रेन पाठोपाठ पोलंडकडेही रशियाची वक्रदृष्टी पडू शकते. अमेरिका आमच्या मदतीची जबाबदारी घेऊ शकणार आहे का नाही, असा प्रश्न पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी उपस्थित केला आहे.
नाटोच्या सदस्य देशांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी नाटोने स्वीकारली असताना असे बेजबाबदार विधान करून ट्रम्प नाटोच्या (Nato) सदस्य देशांमध्ये असुरक्षिततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत, असे जेन्स स्टॉल्टेन्बर्ग यांनी म्हटले आहे.