Ukraine Russia War – रशियाचे एक लढाऊ विमान पाडल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला आहे. मात्र रशियाने हा दावा फेटाळला आहे. हवाई चकमकीनंतर या विमानात बिघाड झाल्यामुळे ते कोसळले, असे रशियाने म्हटले आहे.
विमानभेदी क्षेपणास्त्राचा मारा करून रशियाचे लढाऊ विमान पाडल्याचे युक्रेनने म्हटले आहे. मात्र हे लढाऊ विमान रशियाच्या दक्षिणेकडील स्टॅव्हरोपोल भागात निर्जन भागात कोसळले, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
युक्रेन किंवा रशिया या दोन्हीपैकी कोणाचाही दावा त्रयस्थपणे पडताळला जाऊ शकला नाही. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान जेंव्हा जेंव्हा युक्रेनने रशियाचे विमान पाडल्याचा दावा केला, तेंव्हा रशियाने एकतर तो फेटाळला किंवा त्याबाबत मौन तरी बाळगले होते.
रशियाचे हवाई दल युक्रेनच्या हवाई दलापेक्षा ताकदवान मानले जाते. मात्र पाश्चात्य देशांनी दिलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेमुळे युक्रेनची स्थिती मजबूत झाली आहे. युक्रेनच्या हद्दीमध्ये एक हजार किलोमीटर आत घुसून अधिक आत घुसण्याचे रशियाच्या सैनयाचे प्रयत्न सुरू आहेत.