भोपाळ – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मध्यप्रदेशातून राज्यसभेवर निवडून जाण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्यासाठी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ यांनी नुकतीच त्यांची दिल्लीत भेट घेतली.
त्यामुळे यावेळी सोनिया लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे. साेनियांपुढे मांडण्यात आलेल्या प्रस्तावाची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी सोमवारी दिली.
सोनियांनी राज्यसभेत मध्यप्रदेशचे प्रतिनिधित्व करावे अशी राज्यातील कॉंग्रेसजनांची इच्छा आहे. ती भावना कळवण्यासाठी नाथ यांनी सोनियांची भेट घेतली, असे पटवारी यांनी नमूद केले.
नाथ यांना स्वत: राज्यसभा सदस्य बनण्यात रस असेल तर मध्यप्रदेश कॉंग्रेस पाठिंबा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मध्यप्रदेशातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या ५ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे.
विधानसभेतील संख्याबळ विचारात घेता कॉंग्रेस पक्ष १ जागा जिंकू शकतो. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. कॉंग्रेसचे ६६, तर सत्तारूढ भाजपचे १६३ आमदार आहेत.