नायपितॉ – म्यानमारमध्ये आता आणीबाणीचा काळ सुरू असून त्यातच आता तेथील जुंटाने (लष्करी राजवट) सगळ्या युवकांना लष्कराच्या सेवेत दाखल होणे बंधनकारक केले आहे. महिला असो वा पुरूष सगळ्यांनाच लष्करात सहभागी व्हावे लागणार आहे. जे भरतीपासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतील त्यांना तीन किंवा पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.
म्यानमारमधील सरकारी माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार तेथील जुंटाने लष्करातील भरतीबाबत नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार १८ ते ३५ वयोगटातील सर्व पुरूषांना आणि १८ ते २७ वयोगटातील सर्व महिलांना दोन वर्षांसाठी लष्करात भरती व्हावे लागणार आहे.
भरतीचा अथवा लष्करात सेवा देण्याचा हा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंतही वाढवला जाऊ शकतो. त्याचे कारण जुंटा त्यांच्या विरोधात होत असलेल्या सशस्त्र बंडाला रोखण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांना मनुष्यबळाची कमतरता भासणार आहे व त्यावर उपाय म्हणूनच त्यांनी सगळ्यांना लष्करी सेवा अनिवार्य केली आहे. नव्या नियमानुसार ४५ पेक्षा कमी वय असणाऱ्या डॉक्टरांनाही तीन वर्षांसाठी लष्करात सेवा द्यावी लागणार आहे.
जुंटाने २०२१मध्ये म्यानमारच्या लोकप्रिय नेत्या आंग सान स्यु की यांचे नवनिर्वाचित सरकार सत्तेवरून हुसकावून लावत सत्ता आपल्या हातात घेतली आहे. तेंव्हापासून त्यांना सशस्त्र बंडाचा सामना करावा लागतो आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्या सीमा सुरक्षा बलाचे ३५० जण आणि पश्चिमेकडच्या राखीन प्रांतात तेथील अल्पसंख्यकांशी लढणाऱ्या दलाच्या सैनिकांनी बांगलादेशला पलायन केले आहे.
रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार बंडखोरांच्या विरोधातील युध्दात जुंटाला अपयश येते आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होत चालले आहे. त्यामुळे आता नव्या नियमावलीमुळे आपल्याला बंडखोरांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात मदत होईल असा विश्वास जुंटाला वाटतो आहे.
नागरी सेवेत असणारे, विद्यार्थी तसेच धार्मिक कार्यासाठी नव्याने भरती झालेल्यांना अस्थायी स्वरूपाची सवलत दिली जाऊ शकते. तसेच राष्ट्रीय सुरक्षा ही देशातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे म्यानमारच्या लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.