निवडणुकीमुळे “आरटीओ’ सुस्त

कामकाज थंडावले ः निम्मे कर्मचारी “इलेक्‍शन ड्युटी’वर, कार्यालयात लागताहेत रांगा

पिंपरी  – लोकसभा निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढतच असताना इतर सरकारी कार्यालयातील कामांचा वेग मात्र कमालीचा मंदावला आहे. बहुतेक कर्मचारी हे निवडणूक कामात व्यस्त असल्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज तर कमालीचे सुस्तावले आहे. निवडणूक कामासाठी आरटीओ कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्याने कार्यालयात मोजकेच कर्मचारी उरले आहेत. यामुळे कामाचा वेग मंदावला आहे, तर उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढू लागला आहे. विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

कार्यालयातील निम्मे कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामात व्यस्त आहेत तर, उर्वरीत कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी व कामासाठी जावे लागत असल्याने कार्यालयाचे कामकाज काहीच कर्मचाऱ्या मार्फत कासव गतीने सुरु असल्याने नागरिकांना तास-तास कार्यालयात ताटकळत उभे रहावे लागत आहे. आरटीओ कार्यालयात एकूण 23 कर्मचारी आहेत. त्यापैकी 9 कर्मचाऱ्यांची 14 मार्च पासून निवडणूक कामकाजासाठी विविध ठिकाणी नियुक्‍ती करण्यात आली आहे. बाकीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा विविध कामे देण्यात आली आहेत. यामुळे कार्यालयात मोजकेच काही कर्मचारी कार्यरत आहेत. याचा फटका नागरिकांना बसत असून त्यांना 5 मिनिटांच्या कामासाठी 2-2 तास थांबावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे.

असाही त्रास
एप्रिलच्या प्रचंड उकाड्यात आरटीओ कार्यालय गर्दीने गजबजलेले दिसत आहे. कर्मचारीसुद्धा कामाच्या अतिरिक्‍त ताणाने वैतागले आहेत. तर नागरिकांना वाटत आहे की, आपल्या कामाला मुद्दाम उशीर केला जात आहे. कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर विविध कामासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने व उकाड्याने थकवा जाणवत असल्याने नागरिक बसण्यासाठी जागा शोधत असतात. मात्र, कार्यालयात बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने नागरिकांना जमिनीवर बसावे लागत आहे. कार्यालयातील खुर्च्या तुटल्या असून यावर आरटीओ प्रशासनाने कानाडोळा केला आहे. निवडणूक होईपर्यंत तरी, यात काही बदल होणार नसल्याची माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.

मे महिन्यात काम सुरळीत होणार

सध्या सुरू असलेली परिस्थिती निवडणूक संपेपर्यंत अशीच राहणार आहे. 29 तारखेला मावळ आणि शिरुर लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजातून कर्मचाऱ्यांची सुटका होईल. निवडणूक झाल्यानंतर आयोगाने निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढील दिवशी सुट्टी दिली आहे. अर्थात 30 एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. एक मे रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे दोन मे पासून आरटीओचे सर्व कर्मचारी पुन्हा कामावर परतील. तोपर्यंत वाढलेल्या थकीत कामे पूर्ण करण्यात काही दिवस जातील, अर्थातच आरटीओच्या कामाची गाडी पुन्हा रुळावर येण्यासाठी मे महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.