उपमहापौरपदावर रिपाइंचा दावा

भाजपकडून उत्तर मिळण्याची प्रतीक्षा

पुणे – महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने पुन्हा उपमहापौर पदावर दावा केला आहे. त्यासाठी पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री भाजपच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह कोअर कमिटीच्या सदस्यांची भेट घेऊन हे पद रिपाइंकडेच ठेवण्याची मागणी केली. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत रिपाइंला कोणतेही उत्तर भाजपने दिले नव्हते. त्यामुळे रिपाइं “वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.

2014 च्या लोकसभेपासून रिपाइं भाजपसोबत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीतही रिपाइं भाजपसोबत राहिली. पुण्यात भाजपने रिपाइंला उपमहापौरपद, स्थायी समिती सदस्यपद, तसेच पालिकेत गटनेतेपदही दिले आहे. तर रिपाइंचे पाच नगरसेवक आहेत. त्यामुळे पक्षाकडे असलेले पद कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

काय आहे रिपाइंचा दावा
“राज्यात रिपाइं महायुतीमध्ये आहे. पुणे जिल्ह्यात पक्षाला भाजपने एकही जागा दिली नाही. तसेच रिपाइं आणि भाजपची विचारधारा वेगळ्या असतानाही कार्यकर्त्यांनी विधानसभेला भाजपसाठी काम केले. तर गेल्या दोन-अडीच वर्षांत महापालिकेत कोणत्याही इतर पदासाठीही आग्रह धरलेला नाही. आता पुढील महापालिका निवडणुकीपूर्वी 2 वर्षांत भाजपने राजकीय व सामाजिक बाबी लक्षात घेऊन रिपाइंला पुन्हा उपमहापौरपदाची संधी दिल्यास त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. त्यामुळे उपमहापौरपद पुढील दोन वर्षे रिपाइंकडेच असावे’ असा दावा करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.