पिंपळे गुरव (वार्ताहर) – कासारवाडी येथे भैरवनाथ महाराज उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे पाच वाजता विधिवत पूजा करून सहा वाजता भैरवनाथ महाराजांचा अभिषेक, होमहवन, धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात आले. या वेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
भैरवनाथ महाराजांची तळीभंडार करून भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत शिंदे, पोलीस हवालदार अनिकेत पाटोळे, दत्तात्रय लांडगे, शामराव लांडे, कुणाल लांडगे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
भैरवनाथ महाराजांची बँड पथकासह फटाक्यांची आतिषबाजी करीत भव्य मिरवणूक पालखीतून काढण्यात आली. दुसर्या दिवशी संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत येथील महापालिकेच्या मराठी शाळेजवळ मराठी सांस्कृतिक लावण्यांचा बहारदार कार्यक्रम जल्लोष अप्सरांचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी तरुण युवकांनी व महिलांनी थिरकत्या तालावर नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद लुटला.
तिसर्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा घेण्यात आला. या वेळी एकूण 110 पैलवानांनी सहभाग घेतला. यामध्ये चुरशीच्या लढतीत पै. प्रसाद सस्ते (मोशी) विरुद्ध पै. बजरंग शेळके (सांगली), अनिकेत लांडे (भोसरी) विरुद्ध रुषीकेश भांडे (हिंदकेसरी अमोल बुचुडे आखाडा) यांच्यात कुस्त्या झाल्या.
अखेर दोन्ही कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या. यावेळी पंच व ग्रामस्थांच्या वतीने चारही पैलवानांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भैरवनाथ उत्सव कमिटीने सहकार्य केले.