शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा ‘या’ कारणामुळे अयोध्या दौरा रद्द

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 24 नोव्हेंबरचा अयोध्येचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यामधील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता उद्धव ठाकरे अयोध्येला कधी जाणार आहेत यासंदर्भातील तारीख पक्षाने जाहीर केलेली नाही. मागील वर्षीही ठाकरे कुटुंबीय 24 नोव्हेंबरलाच अयोध्या दौऱ्यावर गेले होते. यंदा राज्यातील राजकीय परिस्थिती स्थिर नसल्याने उद्धव यांनी नियोजित दौरा पुढे ढकलला आहे.

अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी निकाल दिला. पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाल दिला. वादग्रस्त जागेवर ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर उभारण्यात यावे. तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्‍याची जागा देण्यात, असे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला निकाल देताना दिले होते. यानंतर उद्धव ठाकरेंनी या निकालाचे स्वागत केले होते. सुवर्ण अक्षरांनी लिहावा, असा आजचा दिवस आहे. अयोध्येला जाऊन आल्यानंतर वर्षभराच्या आतच हा निकाल आला आहे. आता पुन्हा अयोध्येत जाणार आहे. एक अध्याय संपला आहे. तरी एक नवं पर्व सुरू होत आहे,असे उद्धव या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले.

शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना वंदन करुन तिथली माती घेऊन 24 नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येत जाण्याचा निर्धार उद्धव यांनी व्यक्त केला होता. अयोध्या निकालानंतर शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर आणि महाराष्ट्रात सरकार…. जय श्रीराम! असं ट्विट केले होते. अयोध्या प्रकरणाचा निकाल लागला आता राज्यातील महाराष्ट्रात सरकार कोण स्थापन करणार याचाही निकाल लागेल असे सूचक संकेत त्यांनी या ट्विटमध्ये दिला होता.

मागील वर्षभरामध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमाक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. राम मंदिर प्रश्नासंदर्भात शिवसेनेने वर्षभऱामध्ये अनेक कार्यक्रम घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे काही प्रमुख नेते याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये अयोध्येला गेले होते. शरयु नदीच्या किनारी त्यांनी महाआरतीही केली होती. याच दौऱ्याची जाहिरातबाजी करण्यासाठी पक्षाने राज्यामध्ये पहले मंदिर फिर सरकार असे बॅनर्स लावले होते. लोकसभा निवडणुकीच्या काही महिनेआधीच शिवसेनेने राम मंदिर बांधण्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. उद्धव यांच्या या दौऱ्याची देशभरात चर्चा झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.