शाळेतून येता येता मुलांची जोरदार चर्चा चालली होती. “असे कसे काय?… असे कसे काय?… असे कसे काय?’
झाले काय! आज शेवटचा तास ऑफ होता. त्यावेळी गणिताचे सर वर्गात आले होते. आज वर्गातल्या एका मुलाचा वाढदिवस होता. तर सरांनी दोन-चार मिनिटांतच त्याचा जन्म कोणत्या वारी झाला होता हे सांगितले. पण हे कसे शोधायचे हे मात्र सांगितलेच नाही. उलट अत्यंत सोपे गणित आहे यामागे. तुम्हीच शोधायला हवे असे म्हणत मुलांनाच कामाला लावले. तास संपला पण मुले मात्र अजून निश्चित उत्तरापर्यंत आली नव्हती.
खरं तर मुलांच्या डोक्यात सरांनी टाकलेल्या कोड्याचा किडा वळवळत होता; पण पोटात भुकेचे कावळेही ओरडत होते. शेवटी पोटातल्या कावळ्यांना आधी न्याय देऊन नंतर भेटायचे सर्वानुमते ठरले.
“काही सुचले का कोणाला, कसे कोडे सोडवता येईल ते?’ मिहीरने विचारले.
“असं करू या, एकेक मुद्दा लक्षात घेत आपण उत्तरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू.’
“म्हणजे काय म्हणायचे आहे प्रणव तुला?’ तन्वीने गोंधळून विचारले.
“आता बघ सरांनी काय विचारले, आज तारीख कोणती आणि जन्म कोणत्या वर्षी झाला. म्हणजेच याचा संबंध जन्माच्या वेळच्या वाराशी असणार.’ प्रणवने त्याचा मुद्दा अजून स्पष्ट केला.
“प्रणव, तू म्हणतोस त्यात पॉइंट आहे पण…’ मिहीर अजूनही विचारात होता.
इतकावेळ शांत असणारा अनय एकदम बोलला, “एक लक्षात येते का तुमच्या? दर सात दिवसांनी तोच वार येतो.’
“बापरे! म्हणजे मग आजपासून असे सात-सात दिवस मागे जावे लागेल, पार जन्म वर्षापर्यंत.’ सानवी डोक्याला हात लावत बोलली.
“किंवा असं करू. आज आपल्या मित्राचा तेरावा वाढदिवस होता. म्हणजे तेरा वर्षांतील एकूण दिवस काढू. त्याला भागिले सात करता येईल.’ मिहीरने अजून थोडा सोपा पर्याय सांगितला.
“अरे पण या मध्ये लिप वर्षही येतील ना! म्हणजे त्यावेळी एक दिवस जास्त येईल. म्हणजेच 365 ऐवजी 366 दिवस असतील.’ तन्वीने शंका काढली.
“मला अजून एक सोपं सुचतंय. प्रणव चुटकी वाजवत बोलला. 365 दिवस म्हणजे 52 आठवडे व एक दिवस आणि 366 दिवस म्हणजे 52 आठवडे आणि दोन दिवस. म्हणजे मग या तेरा वर्षांत एकूण लिप वर्ष किती आहेत ते बघितली, तर या तेरा वर्षांत पूर्ण आठवड्यांपेक्षा एकूण किती दिवस जास्त येतील ते शोधू.’
“आणि मग या एकूण दिवसांना सातने भाग दिला की आपले उत्तर मिळेल?’ तन्वीने विचारले.
“आधी आपण सरांनी आजचे उत्तर कसे शोधले त्यासाठी बघू नंतर आपापल्या जन्म तारखेसाठीही करून पाहू.’
अनयचे बोलणे संपता संपताच मिहीरने पटपट गणित मांडले, “हे आहे 2022 साल म्हणजे 2009 साली आपल्या मित्राचा जन्म झाला. आणि या तेरा वर्षांत तीन लिप वर्ष आली आहेत.’
“म्हणजे काही पूर्ण आठवडे आणि एकूण सोळा दिवस जास्त आले. सात ने भाग दिला की दोन बाकी उरते.’ प्रणव उत्साहात बोलला.
“आज आहे शनिवार 7 मे 2022. म्हणजे 2009 मध्ये 7 मे हा शनिवारच्या आधी दोन दिवस गुरुवारी आला असणार’, इती तन्वी.
“अरे हो, सरांनी पण जन्मवार गुरुवार सांगितला होता की. म्हणजे आपण करतो आहे ते बरोबर आहे.’ सानवीने आनंदात चक्क उडीच मारली
येस्स…स! “आपण आता आपापले जन्मवार काढून बघूयात.’ असे म्हणत सगळीजण उत्साहात कामाला लागली. कोडं सोडवल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहत होता. बालमित्रांनो, तुम्हीपण शोधून काढलात का तुमचा जन्मवार?
– विशाखा गंधे