तंबूच्या फटीतून त्यानी बाहेर डोकावलं. सारं कसं शांतशांत. तरीही त्यानी आपल्या बंदुकीचा दस्ता नजरेआड केला नाही. कमरेला पिस्तोल आहे की नाही याची नजरेनं खात्री करून घेतली. उताराच्या दिशेनी दहा पावलं निष्काळजीपणे टाकली आणि अकराव्या पावलाला स्वतःला सावध केलं. कालच्या धुमश्चक्रीची आवर्तनं डोळ्यापुढं आणली.
काल पहाटेपहाटे एका वर्तमानाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. दुर्बिणीच्या फिरत्या पहाऱ्यात त्यांच्या उंचावरील टेकाड्यावरच्या चौकीला गनिमाने घातलेला वेढा पाहिला तेव्हा मेजरसाहेबानी हलकीशी खुणेची घातलेली शीळ ऐकली. चौकीच्या तिन्ही बाजूनी ऑलिव्ह ग्रीन गणवेश पसरला होता. मेजरनी मोजदाद केली अठ्ठावन्न. पाचशे मीटरवर तळाशी गनिमांचा खाकी गणवेश स्थिरावलेला पाहिला. त्याची गिनती केली पंचेचाळीस. पुन्हापुन्हा खात्री करून घेतली. पंचेचाळीस.
मेजरनी अंदाज बांधला उघड गिनती पंचेचाळीस आणि छुपी… कुणास ठाऊक. कदाचित पन्नास किंवा काही नाही. त्यांची शीळ तीनवेळा वाजली याचा अर्थ शांत रहा. पहिली फायरिंग आपण करायची नाही. अर्धातास तीन शीळा अठ्ठावन्न ऑलिव्ह ग्रीन ऐकत होते. पाचशे मीटर अंतर कमी होतंय याची जाणीव त्याच्या दुर्बिणीच्या डोळ्याला होत होती. त्यांनी नजर हटवून मेजरसाहेबांकडं पाहिलं. आदेश नाही. सोळाव्या मिनिटाला अंतर चारशे मीटर झालं. तरीही आदेश नाही.
चार दिवसांपूर्वी आलेल्या रेशन पेटीला जोरदार धक्का बसला. गनिमांची पहिली फैरी झाडली होती. मेजरसाहेबानी शीळ वाजवणं बंद केलं आणि सटासट गोळ्या सुटल्या. चाळीस मिनिटं आसमंतात फैरींचे आवाज, हॅंडग्रेडेड फेकण्याचे आवाज, हर हर महादेवचे आवाज. आणि नीरव शांतता. दंडात घुसलेली गोळीची जखम दाबत मेजरसाहेबानी चौकीतील गिनती केली तेहेतीस. खालून आवाज बंद. हालचाल बंद झालेल्या खाकी गणवेशाची मोजदाद केली पंचेचाळीस. चकमक घडायच्या आधीही खाकी गणवेश पंचेचाळीसच होते. खालून कुठलाच आवाज नव्हता की हालचाल.
तो बॅंडेज घेऊन मेजरसाहेबांकडं धावत सुटला. ते वेदनेने विव्हळत होते. जखमेवर ब्रॅंडीचा शिडकावा आणि अर्धवट ओठांमधून सोडलेली ब्रॅंडीची पिचकारी.
कालचं दृश्य तो परतपरत आठवत होता. आठवणींच्या परसदारी पुन्हा एक आठवण. दिवाळीला कधी नव्हे ती रजा त्याला मिळाली. भाऊ, भावजय, पुतणे-पुतणी,आई-बाबा यांच्या कोंडाळ्यात तो घरात बसला होता. धडाम एक आवाज आला आणि तो दचकला. धावत गच्चीमध्ये आला आणि चारही दिशांना नजर टाकून परत आला. भाऊ आश्चर्यानं म्हणाला, “दादा, लढाई करणारा माणूस तू… आणि फटाक्याच्या आवाजानं दचकलास? बाहेर पळत काय गेलास.’
भावाच्या खांद्यावर हात टाकून तो म्हणाला, “मी दचकलो ते सावध होण्यासाठी. गेल्या दोन वर्षात बारा दहशतवाद्यांचा मी खात्मा केलाय. उघड्या जीपमधून हेडक्वार्टरला त्यांच्या बॉड्या आणल्यात. शत्रूच्या रडारवर मी कायम आहे. ते कदाचित पाठलाग करत, रेकी करत माझ्यामागं इथवर आलेत की काय अशी शंका आली. परिस्थितीची सतत शंका घेत रहाणं हे सैनिक म्हणून माझं जगणं आहे. जगण्याची अनिश्चितता हा आम्हा लोकांचा स्थायी भाव झालाय.’ भावाचा चेहरामोहरा बदलला. त्यांनी दादाला घट्ट मिठी मारली. ती मिठी आपल्याला वजा दहा डिग्री तापमानाला इथं उब देतीय तो मनाशी पुटपुटला.
रात्रीचा भयाण काळोख. तापमान भराभरा घसरतंय. गस्त घालण्याची ड्युटी तो करतोय. चौकीपासून चारशे मीटर खाली तो उतरलाय. आजूबाजूला खाकी गणवेशातील कलेवरं. प्रत्येक बॉडीपाशी जाऊन बंदुकीच्या दस्त्यानं ढोसून पहात तो खात्री करून घेतोय. आकाशात चंद्र नाही, चांदणं तर नाहीच नाही. ढगाळलेले आसमंत. तो डावीकडं, उजवीकडं वर खाली सावध नजरेनं गस्त घालतोय. आठवण झाल्यासारखं ब्रॅंडी तोंडाला लावतोय. आता तो चौकीपासून उताराला बाराशे मीटर खाली सरकलाय. थोडीथोडी झुडपं पायाखाली यायला लागलीत. त्याच्या कानांनी एक अस्फुट आवाज ऐकला. हातातील बंदुकीची पकड घट्ट करत त्यांनी कानोसा घेतला.
एक कण्हल्यासारखं आवाज. श्वापद का माणूस? दबकी पावलं टाकत तो आवाजाच्या दिशेनी सरकला. बॅटरीच्या उजेडात एक खाकी गणवेश. त्याचा चेहरा कठोर झाला. तो आणखी पुढं सरकला. एक केविलवाणी नजर कष्टानी त्याच्या सन्मुख म्लान होऊन पडली होती. अंगाखांद्यावर सुकलेल रक्त, गणवेश जागोजागी फाटलेला. पाठीवरची सॅक बाजूला पडलेली. अंग थरथरतंय. हुडहुडी भरलेली स्पष्ट जाणवतीय. तो ओणवा बसला. जीवंत प्रेताच्या अंगाला हात लावून पाहिला. जवळपास एकशे दोन ताप असावा. त्याच्या उघड्या तोंडात त्यांनी घोटभर पाणी घातलं. तेव्हढ्या पाण्यामुळं जीव आल्यासारखा खाकीनी हात हलवला. एक ऑलिव्ह ग्रीन खाकीच्या वासलेल्या तोंडात ब्रॅंडीचे थेंब टाकत राहिला. त्याच्या तोंडाशी कान लावून तो ऐकत राहिला.
“भाईसाब मुझे मत मारो. तू एक सैनिक है… मै भी सैनिक हूं.’ तो बरंच काही बोलत राहिला. पण ह्यानी ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं.
थंडी खूप वाढली होती. कदाचित काही घटकात हिमवादळ यायची शक्यता होती. त्याला चौकीवर गस्त आटोपून लवकर पोचायला हवं होतं. क्षणभर त्यानी विचार केला. स्वतःची सॅक, बंदूक, मर्यादित दारूगोळा यांचं पंचवीस किलो वजन. तापमान बहुदा वजा पंधरा किंवा जास्तीही. या गनिमाचं वजन साठ किलो. थंडीनं पाऊल स्थिर रहात नाही. याच्या नजरेतील याचना. गेली पाच दशकं या लोकांनी दिलेला त्रास. घरादारापासून कित्येक महिने आपल्याला कंठावे लागणारे दिवस. त्यांनी ओठावर ओठ दाबले. खाकी धूड, दोन सॅक, दोन बंदुका आणि गुणिले दोन दारुगोळा पाठीवर टाकून त्यांनी चौकीच्या दिशेनी पहिलं पाऊल टाकलं. खाकीनी ऑलिव्ह ग्रीनच्या खांद्यावर थोपटलं.
पावलांचा वेग कमी होतोय, थंडीचं प्रमाण वाढतंय. चौकी दिसायला लागलीय. चालण्यामुळं आणि गनिमाच्या कवटाळण्यानं थंडीचं काहूर आटोक्यात येतंय.
तो चौकीत पोचला. त्यांनी खाकी धूड खाली टाकलं. सगळे सहकारी त्या दोघांच्या भोवती कोंडाळं करू उभे होते. पडल्यापडल्या खाकीनी त्याच्या पायावर डोकं टेकवत म्हटलं, “भाईजान आपने मुझे यहॉंतक लाके बडी मेहरबानगी की.’
ऑलिव्ह ग्रीन त्याला म्हणाला, “तुम्हे शायद लगा होगा की भूतदयाकी वजहसे मैने तुझे उठाया. वो बात नही है. इस थंडमे मुझे इधरतक आनेमे दिक्कत हो रही थी. तुम्हे गले लगानेसे मुझे वॉर्म लगा, ऊर्जा मिली. अभि तेरी जरुरत मुझे बिल्कूल नहीं, चाहे तो मै अभि तुम्हे मार सकता हूँ. तेरा जो कुछ करनेका हैं वो ये लोग डिसाइड करेंगे.’
– दीपक पारखी