दुबई – आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा मुख्य फलंदाज विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली आहे. कर्णधार रोहित शर्माला मात्र, लाभ झाला असून त्याने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. ही क्रमवारी विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारत विरूध्द बांगलादेश सामन्याच्या आधी जाहीर करण्यात आली आहे.
कोहली सातव्या क्रमांकावरून संयुक्तरिक्या आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या नावावर 711 रेटिंग गुण आहेत. तर इंग्लंडचा डेव्हिड मलानचेही 711 रेटिंग गुण आहेत. रोहित 5 स्थांनीच झेप घेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे 719 रेटिंग गुण आहेत. याच क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल यांच्यात अव्वल स्थानासाठी स्पर्धा सुरू आहे. सध्या तरी बाबरचे अव्वलस्थान कायम असून गिललाही त्यावर दावा करण्यासाठी संधी आहे. सध्या तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या दोन गोलंदाजांचा समावेश आहे. कुलदीप यादव व महंमद सिराज हे दोघे पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये दाखल झाले आहेत. सिराज 656 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कुलदीपल यादव 641 पगुणांसह सहाव्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड 660 रेटिंग गुणांसह अव्वलस्थानी आहे. सध्या भारतात एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा सुरु असून भारतीय संघाची विजयी आगेकूच अशीच कायम राहिली तर भारताच्या क्रिकेटपटूंना या क्रमवारीत प्रगती करण्याची संधी आहे.